'तुला शिकवीन चांगलाच धडा'फेम अभिनेत्याने केली डॉक्टरांची पोलखोल, म्हणाला 'पैशांसाठी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 05:50 PM2023-09-04T17:50:15+5:302023-09-04T17:50:36+5:30
अभिनेत्याच्या पत्नीला हृदयसंबंधित आजार असून गेल्या कित्येक वर्षांपासून त्या यावर उपचार घेत आहेत.
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा. ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रिय ठरत आहे. अक्षरा आणि अधिपती यांच्यातील मैत्री प्रेक्षकांना भावत आहे. यामध्येच या मालिकेतील एका अभिनेत्याने चक्क डॉक्टरांची पोलखोल केली आहे. सध्याच्या काळात डॉक्टर सुद्धा कसे पेशंटला लुटतात हे त्यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे.
अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आपल्या पत्नीच्या आजारपणात डॉक्टरांनी कशाप्रकारे पैसे लाटायचा प्रयत्न केला हे सांगितलं आहे.
काय आहे सतिश राजशेखर यांची पोस्ट?
*#डॉक्टर_डॉक्टर*
एक पुरातन म्हण आहे… तुमचा वैद्य हा निष्णात आणि सदहेतुचाच हवा… अन्यथा….जुनी गोष्टय…आज सांगावीशी वाटली..पत्नीला, तेजुला Rheumatic valvular heart disease आहे.. लहानपणी आलेल्या एका तापाचा परिणाम म्हणुन तिच्या ह्रदयातला वॉल्व आक्रसला..ह्रदयाच्या वरच्या कप्प्यातलं रक्त या संकुचीत वॉल्वसाईज मुळे खालच्या कप्प्यात पुरेशा वेगाने जात नाही… ते चोक होतं..हा तसा गंभीर आजार आहे.. दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम करणारा… ढोबळ उदाहरण सांगायचं तर सहसा आपल्याला पाच जीने चढुन जशी धाप लागेल तशी तिला पहिल्या काही पायऱ्यातच लागायची…तर हा आजार कळला ९०च्या पुर्वार्धात.. त्यावेळी उपलब्ध असणारे सर्व उपचार सुरु झाले.. तीन आठवड्याला एक ईंजेक्शन, गोळ्या ई..पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमधे वॉल्व रिप्लेसमेंट ऑपरेशनही ठरलं होतं.. पण अगदी आदल्या दिवशी अमेरिकेतल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करुन ती ओपन हार्ट सर्जरी रहित केली रुबीच्या डॉक्टरनी.. ईंजेक्शन गोळ्यावरच आणखी काही काळ ठेवायचा निर्णय झाला…या पार्श्वभुमीवर आमचं लग्न आणि मुलांचा जन्म ही वेगळीच चित्तर कथा…तर आम्हाला तेजुची ठरावीक काळाने ईकोकार्डीयोग्राफी करावी लागे.. डॉ. नाथ करायचे..अत्यंत अनुभवी, सिनीयर, कडक शिस्तीचे, मितभाषी असे आर्मीतले डॉक्टर ते.. डॉक्टर नाथ आम्हाला म्हणाले होते की, “देखो बेटा.. ये वॉल्व साईज मेंटेन्ड है तब तक चिंता की बात नही.. ऑपरेशन तो करना पडेगा.. लेकीन जब वो साईज और कम हो जाता है तब… ऑपरेशन का डिसीजन सही वक्त पे होना चाहिये.. वो मै बताऊंगा.. ना जल्द बाजी हो, ना देर हो.. हार्ट के साथ खिलवाड नही होना चाहिये..” आम्ही त्यांचा शब्द प्रमाण मानायचो.. आमचं बाकी रुटीन सुरु होतं.. मु़ळात माझ्या बायकोच्या आत्मिक शक्तीच्या बळावर.. तीचा युनिवर्सीटीत जॉब आणि संसार एकावेळी १००% देऊन सुरु होता..
आमच्या दोन्हीकडच्या कुटुंबात, मित्रपरिवारात तिचा हा आजार एक सतत काळजीचा आणि चर्चेचा विषय…तिच्या माहेरच्या विस्तारीत कुटुंबात काही डॉक्टर होते.. ते लक्ष ठेवुन असायचे.. ईतरही कोणी काहीबाही सुचवत, सांगत असायचे..तर असच एकदा माझ्या एका डॉक्टर साडुंनी आम्हाला सांगीतलं की “शासकिय दवाखान्यात सगळे अत्याधुनिक मशिन्स आलेयत.. तिथले ‘डॉक्टर अमुक अमुक’ हे चांगले ह्रदयरोगतज्ञ आहेत.. एकदा सहज त्यांना दाखवुन घ्या.. माझं बोलणं झालंय..साडुंनी ईतक्या काळजीने, प्रेमाने सांगीतलं होतं की त्यांच्या ईच्छेचा मान राखण्यासाठी आम्ही त्या ‘डॉक्टर अमुक” यांच्याकडे गेलो..त्यांनी तिथल्या नव्या मशिनवर ईको केली..आणि मग त्यांच्या केबिनमधे आम्हाला बोलावुन साधारण तेच सांगीतलं जे डॉक्टर नाथ सांगायचे..की “वॉल्व साईज लहान आहे.. पुढे कधीतरी ऑपरेशन करावं लागेल.. तोवर ईंजेक्शन गोळ्या सुरु ठेवा..” ई. सोबत त्यानी त्याकाळात असायचा तसा टाईपरायटरवर टाईप केलेला रिपोर्ट दिला..
त्यात वॉल्वसाईज मेन्शन केलेला होता.. जो आमच्या परिचयाचा होता..पुढे गप्पात त्यानी आमची चौकशी केली.. काय करता वगैरे.. मी त्याकाळी फार काही करतच नव्हतो..तेजुने तिच्या जॉबबद्दल सांगीतलं..त्यानी विचारलं “शिवाजी यूनिवर्सिटी मधे परमनंट जॉब आहे ? काय पोस्ट ?” तेजुने डिटेल्स सांगीतले..मग अचानक त्यानी आम्हाला थोडावेळ बाहेर बसायला सांगीतलं… आणि माझ्या हातात दिलेला तो ईकोचा रिपोर्ट परत मागुन घेतला…आम्ही बुचकळ्यात.. आता काय ?!! पंधरा वीस मिनीटानी त्यांनी पुन्हा आत बोलावलं तेव्हा त्यांचा नूर आणि सुर बदलला होता…
मघाचे सहज गप्पा मारणारे ते ‘डॉक्टर अमुक’ आता गंभीर झाले होते.. “हे बघा.. यांच्या वॉल्वची साईज क्रिटीकल आहे.. लगेच ऑपरेशन गरजेचं आहे.. निर्णय घ्यावा लागेल.. नाहीतर मोठी रिस्क आहे” आम्ही दोघे चक्रावुन त्यांच्याकडे आणि एकमेकांकडे पाहु लागलो..“ईथे काही होणार नाही… तुम्ही माझ्या प्रायवेट हॉस्पिटलला ॲडमीट व्हा उद्याच… गुरुवारी ऑपरेशन करुन टाकु… मी तुमच्या साडुंना फोन करतो.. उद्या ११वा ॲडमिट व्हा..” त्यानी रिपोर्ट माझ्या हातात देऊन आम्हाला निरोप दिला.. दुसऱ्या दिवशी ॲडमीट होण्याबद्दल पुन्हा बजावुन…भांबावलेले आम्ही बाहेर आलो… काही क्षण बोललोच नाही.. सगळं ईतक्या त्वरेने बदललं होतं… अवघ्या १५ मिनीटापुर्वी हेच डॉक्टर अमुक अगदी निवांतपणे डॉक्टर नाथांचच म्हणणं आम्हाला सांगत होते.. मग काही मिनीटात असं अचानक काय झालं ?!!३६० अंशात त्यांचं म्हणणं बदलताना आम्ही पाहिलं…
भानावर येऊन मी कॉईन बॉक्स वरुन लगेच डॉक्टर नाथांच्या क्लीनिकला फोन लावला.. तर ते पुण्याला गेलेत आणि शनिवारी येणार असं कळलं… १९९९ साल ते… मोबाईल्स नव्हते तेंव्हा..विवंचनेतच आणखी एक दोन कामं आटोपुन आम्ही घरी आलो तर घरी मोठी मिटींग लागलेली…उभय कुटुंबातली मंडळी एकवटलेली…आम्ही बाहेर पडताच डॉक्टर अमुक अमुकनी साडुंना फोन लावला होता.. ते बिचारे तातडीने त्यांचं काम सोडुन घरी आलेले..गुरुवारच्या ऑपरेशनचं नियोजन सुरु झालेलं…त्या चर्चेत आम्ही सांगायचा प्रयत्न केला की डॉक्टर अमुकनी आमच्या डोळ्यादेखत पलटी मारलीय… पण थेट तसं सांगता येईना कारण ते साडुंचे परिचीत होते… त्यांनी विश्वासाने सदिच्छेने त्या डॉक्टर अमुककडे आम्हाला पाठवलं होतं….मोठाच गदारोळ माजला…मी आणि तेजु ‘डॉक्टर नाथ येतील तोवर थांबु म्हणालो’ तर आम्ही ऑपरेशनची टाळाटाळ करतोय असं मंडळींना वाटलं… “आर्थिक बाबींचं प्रेशर घेऊ नका, आम्ही आहोत” वगैरे सुरु झालं…
तेजुला आणि मला तोवर डॉक्टर अमुक अमुकचा पवित्रा कसा अन का बदलला हे कळलं होतं… तिची राज्य सरकारी नोकरी त्याना उमजली होती… ऑपरेशनचं जे काही बील होईल त्याची reimbursement शासनाकडुन सरकारी कर्मचाऱ्याला मिळते… त्यामुळे खर्चात पेशंट हयगय करत नाही… बिलात सुट मागत नाही…
‘बरं जे ऑपरेशन भविष्यात कधीतरी करावं लागणार आहे, त्यावेळी कोणीतरी डॉक्टर ते करणारच आहे, तर आत्ता आपल्याच दुकानात करुन टाकु.. फारतर पुढे पुन्हा एकदा करावं लागेल.. होईल पेशंटचा थोडा खेळ, पण आपल्या नव्या हॉस्पिटलला आज गिऱ्हाईक मिळेल‘ टाईप्स प्लॅनिंग असावं..आम्ही हे आडुन आडुन सांगायचा प्रयत्न केला पण मंडळी ऐकायच्या आणि थोडीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नव्हती…सेकंड ओपिनियन घ्यावं असं ठरलं..पण डॉ. नाथ येईपर्यंत थांबण्याची कुणाची तयारी नव्हती..दुसऱ्या दिवशीच आणखी एका परिचीत डॉक्टरांकडे सांगलीला गेलो.. त्यानी पुन्हा ईको केली..पण त्यानी नरोवा कुंजरोवा केलं…“ऑपरेशन करायला हरकत नाही” असं मत दिलं..आणि तोवर ईकडे डॉक्टर अमुक अमुक यांच्या हॉस्पिटल मधुन (आज रुजलेला पण त्याकाळात सर्वस्वी अनपेक्षीत असणारा) ‘पाठपुरावा’ लॅंडफोनवर सुरु झाला होता… फोन वर फोन… “पेशंट ॲडमिट झाले नाहीत अजुन… बेड ठेवलाय… गुरुवारी ऑपरेशन आहे..”
असं आजच्या क्रेडीट कार्डवाल्यांच्या वरताण.. गोंधळाचं वातावरण झालं…
कुटुंबियांचं म्हणणं की दोन डॉक्टर सांगतायत तर त्वरीत ऑपरेशन गरजेचंच असणार..
ओळखीचे डॉक्टर आहेत..
उगाच का कोण पाठपुरावा करेल..
जिवाची रिस्क का घ्यायची ?!!
प्रेशर वाढायला लागलं..
शेवटी एक वेळ आली जेव्हा मी निक्षुन सांगीतलं की “डॉक्टर नाथ येईपर्यंत मी थांबणार.. माझी बायको आहे.. काही झालं तर जबाबदारी माझी…”याचा थोडापरिणाम झाला.. माझ्या मनात तरी धाकधुक होती.. पण तेजु निवांत होती..
एकेक दिवस जात होता..घरचे साधारण मला गुन्हेगाराची वागणुक देत होते..आणि त्या डॉक्टर अमुकची रिसेप्शनीस्ट घरी येऊन रहायची बाकी होती…कसंबसं आम्ही थोपवुन धरलं होतं.. अखेर शनिवारी डॉक्टर नाथ भेटले.. मी त्यांना सगळा प्रकार सांगीतला… “मुझे देखने दो” संयत स्वरात ते म्हणाले… त्यानी पुन्हा तेजुची ईको केली…बाहेर आल्यावर त्यांनी सगळ्या कुटुंबीयांना समोर बोलावलं..दोन्ही कुटुंबातले सगळे महत्वाचे लोक सोबत होतेच…
डॉक्टर नाथ म्हणाले
“वॉल्व के साईज मे कोई चेंज नही है..
ये ऑपरेशन का वक्त नही है..
आज किसी भी और डॉक्टर को आप दिखाओगे, तो वो कहेगा के ऑपरेशन कर डालो.. लेकिन ऑपरेशन सही वक्त पे करना जरुरी है..ईस वॉल्व साईज के साथ मेरी पेशंट जॉब कर ही है.. बच्चे संभाल रही है.. मै मॉनीटर कर रहा हुं..थोडीसी जो तकलीफ है वो रहेगी, उसके लिए ईंजेक्शनंस, दवाईया लेती रहे.. ये लडकी मेरी बेटी जैसी है.. ऑपरेशन का वक्त जब आएगा मै बताऊंगा”
डॉक्टर नाथांचे शब्द ईतके आश्वासक होते की मग कुणाच्या मनात काही शंका उरली नाही..ते प्रकरण शमलं.. डॉक्टर अमुकची रिसेप्शनीस्ट पण थकली कधीतरी..आमचं रुटीन सुरु राहिलं..पुढे तब्बल सात वर्ष गेली..२००५ च्या डिसेंबर मधे माझे पप्पा गेले.. आणि त्या मानसिक धक्याने की काय.. तेजुचा त्रास वाढला..डॉक्टर नाथ यावेळी ईको नंतर म्हणाले “अब ऑपरेशन करालो बेटी..”लगेचच तयारी केली आणि पुण्यात रुबीला डॉक्टर साठेंना भेटलो..सुदैवाने तोवर ओपन हार्ट सर्जरीची आवश्यकता राहिली नव्हती..डॉक्टर साठेंनी BMV केली..शिरेतुन एक हवेचा बलुन ह्रदयाच्या वॉल्व मधे नेला, तो आवश्यक तेवढा फुगवला ज्यामुळे वॉल्वचा साईज वाढला.. रक्त पास होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.. आणि बलुन काढुन घेतला..
डॉक्टर साठेंनी अक्षरशः शीळ वगैरे वाजवत काही मिनीटात हे ऑपरेशन पार पाडलं…दुसऱ्याच दिवशी आम्ही कोल्हापुरला परत सुध्दा आलो…आज १७ वर्ष झाली त्यालाही.. देवकृपेने तेजुची तब्येत चांगली आहे… काही पथ्य, पुरक औषध आणि काही काळाने ईको वगैरे एवढं सुरु आहे….आमचे डॉक्टर नाथ आता नाहीत… तहहयात त्यांच्या ऋणात राहु आम्ही… आपल्या करियरमधे अशा कितीजणांच्या दुवा घेतल्या असतील त्यांनी!!!!ते ‘डॉक्टर अमुक’ आता नामांकित ह्रदयरोग तज्ञ आहेत. हॉस्पिटल जोरदार सुरु आहे.. ‘स्टेंथमॅन’ म्हणुन प्रसिध्द आहेत… ‘आला पेशंट घाल स्टेंथ’ धर्तीवर..दरम्यानच्या काळात मेडीकल फिल्डचं रीतसर व्यापारीकरण झालचं आहे…आता काय.. रेडीयो, टिव्हीवर, रेस्टोरन्ट सारख्या हॉस्पिटलच्या जाहिराती प्रफुल्लीत आवाजात सुरु असतात..“फक्त ईतक्या रुपयात अमुक अमुक सर्जरी.. एकदा अवश्य भेट द्या” वगैरे…हल्लीच घर शिफ़्ट करताना ‘डॉक्टर अमुकचा’ तो ‘त्या’ दिवशीचा ईकोचा रिपोर्ट सापडला होता.. ज्यात वॉल्वचा आधी त्यानीच नमुद केलेला साईज, (रिपोर्ट आमच्याकडुन परत घेऊन) व्हाईटनर लावुन खोडलेला होता… आणि तो ‘पुरेसा’ कमी दाखवुन परत आमच्या हातात रिपोर्ट दिला होता…तर अशी कथा!