कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी, रांगडी प्रेमकथा '#लय आवडतेस तू मला'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:09 PM2024-10-10T16:09:15+5:302024-10-10T16:11:42+5:30
'कलर्स मराठी' वाहिनीवर लवकरच '#लय आवडतेस तू मला' ही मालिका दाखल होणार आहे. सानिका आणि सरकार या दोन पात्रांसह त्यांच्या गावांभोवती फिरणारी ही मालिका आहे.
'कलर्स मराठी' वाहिनीवर लवकरच '#लय आवडतेस तू मला' ही मालिका दाखल होणार आहे. सानिका आणि सरकार या दोन पात्रांसह त्यांच्या गावांभोवती फिरणारी ही मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेची पहिली झलक समोर आली असून प्रेक्षकांना आता मालिकेची उत्सुकता आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
सानिका आणि सरकार या दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पात्रांभोवती फिरणारी '#लय आवडतेस तू मला!' ही मालिका आहे. दोन प्रेम करणाऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचं प्रेम मान्य नाही अशा अनेक प्रेमकथा आजवर आपण पाहिल्या आहेत. पण साखरगावची अल्लड सानिका आणि कळशी गावचा रांगडा सरकार यांच्या प्रेमकथेला तर त्या दोघांच्या गावांचाच विरोध आहे. कारण या गावांमध्ये आहे पिढीजात वैर... जे एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाही, अशा वातावरणात बहरणार का सानिका आणि सरकारचं अल्लड प्रेम? शत्रूत्वाच्या आगीत फुलणाऱ्या ही आगळीवेगळी प्रेमकथा उलगडणारी गोष्ट म्हणजे '#लय आवडतेस तू मला'.
मालिकेत सानिकाचे वडील साहेबराव पाटील यांच्या भूमिकेत संजय खापरे आहेत. साहेबराव पाटील हे साखरगावच्या साखरकारखान्याचे मालक आहेत. तर सरकारचे वडील हे साखरकारखान्यातील कामगारांचे यूनियन लिडर आहेत. अभिनेते किरण माने या मालिकेत सरकारच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. '#लय आवडतेस तू मला!' १४ ऑक्टोबरपासून रात्री ९.३० वाजता भेटीला येणार आहे.