"हाताने खाऊ घालण्याचं सुख आणि...", नेहा शितोळेची अशोक मामांसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:45 IST2025-04-15T09:44:54+5:302025-04-15T09:45:23+5:30
Neha Shitole And Ashok Saraf : अभिनेत्री नेहा शितोळे हिने अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

"हाताने खाऊ घालण्याचं सुख आणि...", नेहा शितोळेची अशोक मामांसाठी खास पोस्ट
अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सध्या ते अशोक मा.मा. या मालिकेत काम करताना दिसत आहेत. तसेच त्यांचा नुकताच अशी ही जमवा जमवी हा सिनेमादेखील प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole) हिने अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
नेहा शितोळेने सोशल मीडियावर अशोक सराफ यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ती अशोक मामांना जेवण वाढताना दिसते आहे. तर दुसऱ्या फोटोत ते गप्पा मारत आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, ज्यांच्या डब्यातला खाऊ खाऊन काम करायची ऊर्जा मिळते त्यांना आपल्या शहरात घरासारख्या भासणाऱ्या कामाच्या जागेत स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याचं सुख आणि भाग्य काही औरच आहे... लौकर परत ये असं अशोक मामा जसं फुलराणीला सांगतात तसंच माझ्या प्रगतीवर लक्ष ठेऊन अजून चांगलं काम करत रहा हे ही ते खऱ्या आयुष्यातही हात हातात घेऊन हक्काने सांगतात... हे प्रेम, हा आशीर्वाद असाच मिळत राहो... निमित्त होतं अशी ही जमवा जमवी या चित्रपटाच्या प्रमोशनचं... खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी चित्रपट चित्रपटगहांमध्ये जाऊन पहा... मामा रॉक्स... #
'अशी ही जमवा जमवी'बद्दल
अशी ही जमवा जमवी सिनेमात थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी कथा आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांसोबत ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांची फौज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश गुप्तेने केले आहे. हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.