अलिबागच्या कोळीवाड्यात पार पडलं मुक्ता-सागरचं केळवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:27 IST2023-12-25T14:25:53+5:302023-12-25T14:27:47+5:30
Premachi Goshta : गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्या मुक्ता-सागरचा विवाह सोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे.

अलिबागच्या कोळीवाड्यात पार पडलं मुक्ता-सागरचं केळवण
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्या मुक्ता-सागरचा विवाह सोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. मेहंदी, संगीत आणि हळद तर थाटात पार पडली आहे. आता उत्सुकता आहे ती लग्नाची. गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून विवाहसोहळ्यात स्टार प्रवाह परिवारातले खास पाहुणेही येणार आहेत.
प्रेमाची गोष्ट मालिकेत लग्नाची धामधूम पाहायला मिळेलच. पण पडद्यामागेही मुक्ता-सागरच्या लग्नासाठी प्रेक्षकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अलिबागमधल्या कोळीवाड्यात नुकताच मुक्ता-सागरचं केळवण पारंपरिक पद्धतीने पार पडले. सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर यांनी मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली. प्रेमाची गोष्ट मालिकेतल्या कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता. कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झालं आणि रंगला सुग्रास केळवणाचा बेत. अलिबागकरांचं प्रेम पाहून मुक्ता-सागर भारावून गेले.
केळवणाच्या या खास दिवशी मुक्ताने खास उखाणाही घेतला. नलिनी काकूंनी आमंत्रण देऊन प्रेमाची गोष्ट केली मोठी. स्टार प्रवाहच्या साक्षीने भरली मुक्ताची खणा नारळाने ओटी. अलिबागकरांनी घातलाय सागर-मुक्ताच्या केळवणाचा घाट. पहाण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरुन इंद्रा आजीचा हात. मुक्ताच्या या उखाण्याने केळवणाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि कलाकारांनी पुन्हा मुंबई गाठली. मुक्ता-सागरचा विवाहसोहळा अनुभवायचा असेल तर प्रेमाची गोष्ट रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.