'कोण होणार करोडपती'चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, २३ फेब्रुवारीपासून नाव नोंदणीला सुरूवात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 16:11 IST2022-02-10T16:10:52+5:302022-02-10T16:11:18+5:30
Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत.

'कोण होणार करोडपती'चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, २३ फेब्रुवारीपासून नाव नोंदणीला सुरूवात!
सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. गेल्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
प्रत्येक खेळात कोणी जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो आला आहे. २३ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होण्यासाठीचे प्रश्न सुरू होतील. १४ दिवस आणि १४ प्रश्न असं याचं स्वरूप आहे. 7039077772 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्हवर नावनोंदणी करून या खेळात सहभागी होता येईल.
करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे.