'गाथा नवनाथांची' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, सुरू होतंय नवनाथांचं महापर्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 05:57 PM2024-09-24T17:57:50+5:302024-09-24T17:58:42+5:30

Gatha Navnathachi Serial : 'गाथा नवनाथांची' ह्या पौराणिक मालिकेवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले. मालिकेत आत्तापर्यंत नवनाथांचे अवतार, त्यांचा प्रवास आणि चमत्कार हे सर्व दाखवण्यात आले आहे.

The series of 'Gatha Navnathachi' is on an exciting turn, the Navnath festival is starting | 'गाथा नवनाथांची' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, सुरू होतंय नवनाथांचं महापर्व

'गाथा नवनाथांची' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, सुरू होतंय नवनाथांचं महापर्व

सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखवणार्‍या 'गाथा नवनाथांची' (Gatha Navnathachi Serial) पौराणिक मालिकेवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले. मालिकेत आत्तापर्यंत नवनाथांचे अवतार, त्यांचा प्रवास आणि चमत्कार हे सर्व दाखवण्यात आले आहे. सध्या नाथांचे प्रवास आणि त्यांचे चमत्कार भक्त प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सुरुवातीपासूनच नाथांचा जन्म, त्यांची जडणघडण, शिकवण, गुरु-शिष्य परंपरा असा प्रत्येक नाथाचा प्रवास पाहायला मिळाला. आता मालिकेत नारद आणि चरपटीनाथ यांची गोष्ट पाहायला मिळते आहे.  आजी आणि डाकीण यांच्याकडून चरपटीला अन्नात विष दिले जाते, पण नारद चरपटीचे रक्षण कशा प्रकारे करणार, हे आता आपल्याला पाहायला मिळाले. जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्याकडून अग्नितत्त्व आणि शक्ती कशा प्रकारे दिली जाणार, हेसुद्धा पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त नाथांची शिकवण आणि चमत्कार पाहायला मिळतील. गाथा नवनाथांची मालिकेत आता महापर्व सुरू होते आहे. या महापर्वात निरनिराळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

सध्या मालिकेत अडभंगिनाथांची गोष्ट दाखवण्यात येते आहे. अडभंगिनाथांकडे महादेवांचे आगमन होणार आहे. महादेव, पार्वती आणि संपूर्ण गण असे सगळे एकत्र अडभंगिनाथांकडे विशेष भोजनासाठी येणार आहेत. आता अडभंगीनाथ महादेवांचे स्वागत कशा प्रकारे करतील, ते आता पाहता येईल. त्याव्यतिरिक्त मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, जालिंदरनाथ हे सगळे नाथ पुन्हा एकत्र पाहता येणार आहेत. महादेवांना भीमाशंकर का म्हणतात याबद्दल महादेवांकडून स्वतः शिकवण देण्यात येणार आहे. भीमा राक्षसाने सगळीकडे विध्वंस केला होता. जीवितहानी, पशु पक्षांचं जीवन त्याने अवघड करून ठेवला होता. महादेवांनी त्याचा संहार केला. महादेवांनी भीमा राक्षसाचा कशाप्रकारे वध केला हे पाहायला मिळेल . त्यांनी केलेले चमत्कार, त्यांची शिकवण पाहायला मिळेल.                  


मालिकेत आत्तापर्यंत माशाच्या पोटातून आलेले मच्छिंद्रनाथ, गोरक्षेतून अवतरलेले गोरक्षनाथ, मातीतून अवतरलेले गहिनीनाथ, अडभंगीनाथ  आणि अग्निकुंडातून अवतरलेले जालिंदरनाथ यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केल्याचं दाखवण्यात आलं आहे.मालिकेचे निर्माते आणि लेखक संतोष अयाचित यांचा या प्रवासात फार मोठा हातभार लाभला. त्यांनी लिहलेले संवाद आणि नाथांच्या जन्मापासूनच्या गोष्टी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. टीव्ही च्या इतिहासात सोनी मराठी वाहिनीने पहिल्यांदाच अशी पौराणिक मालिका आणली.  हा वेगळा प्रयोग  जनसामान्यांत लोकप्रिय झाला आहे. नवनाथांचे जन्म आणि त्यांच्या कार्यकथा दृश्य स्वरूपात कधीही सादर झाल्या नव्हत्या. या मालिकेत त्या कथा दृश्य स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. 

Web Title: The series of 'Gatha Navnathachi' is on an exciting turn, the Navnath festival is starting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.