"रंगभूमी हेच माझं पहिलं प्रेम..", 'रिश्तों का लाइव्ह टेलिकास्ट'मधील अभिनेत्री स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:32 PM2023-03-30T18:32:03+5:302023-03-30T18:35:43+5:30
अभिनेत्री म्हणाली, रंगभूमी हेच माझं पहिलं प्रेम आहे. रंगभूमी कलाकार असल्याचं समाधान व शो’बिझमुळे मिळत असलेलं नाव, प्रसिद्धी आणि पैसा यांची तुलनाच होऊ शकत नाही.
अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी आयुष्यात अनेक अनपेक्षित वळणं पाहिली, मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचं रंगभूमीवरील प्रेम कायम राहिलं. त्या ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थिनी दशेत रंगमंचाच्या मोहात पडल्या आणि अखेरीस नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एनएसडीत प्रवेश घेतला. 1982 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेतल्यानंतर, त्यांची महत्त्वपूर्ण कारकीर्द सुरू झाली. त्यांनी आजपर्यंत टेलिव्हिजन, सिनेमा, थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांसारख्या विविध माध्यमांतील अनेक मापदंड पार केले आहेत.
झी थिएटरच्या 'हमिदाबाई की कोठी' आणि 'रिश्तों का लाइव्ह टेलिकास्ट' या मालिकेमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री सांगते, "रंगभूमी तुम्हाला एखाद्या व्यक्तिरेखेविषयी अंतर्मुख व्हायला शिकवते आणि व्यापक तालमीद्वारे तुमची कौशल्यं धारदार होत जातात. तुम्हाला ही शिस्त आणि सराव कालांतराने विविध माध्यमांत अधिक चांगलं सादरीकरण करण्यास मदत करतात. टीव्हीवरील मालिका म्हणजेच टेलिप्ले हे थिएटरची व्याख्या अतिशय असामान्य पद्धतीने करत असतात आणि 'हमिदाबाई की कोठी' आणि 'रिश्तों का लाइव्ह टेलिकास्ट' मध्ये काम करणं माझ्यासाठी खूप रंजक आहे."
'रिश्तों का लाइव्ह टेलिकास्ट' मधील आपल्या भूमिकेबद्दल हिमानी म्हणते, "मी एका खंबीर आईची भूमिका साकारते आहे आणि ज्या महिलांना गृहीत धरण्यात आले अशा सर्व महिलांना ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटेल. कुटुंबातील सदस्यांमधील जे वास्तविक संवाद घडतात, त्यांचं दर्शन या मालिकेत होईल. विशेषत: अशा वेळी जेव्हा लोक एकमेकांसोबत वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्या गॅझेटमध्ये वेळ घालवतात. जेव्हा नात्यांना प्रेमाचं खतपाणी मिळतं, तेव्हाच ती बहरतात.”
जेव्हा त्या स्वतःच्या प्रवासाकडे मागे वळून पाहतात, तेव्हा हिमानी यांना अनेक अनपेक्षित वळणं दिसतात. त्या भूतकाळात हरवतात, "मी नव्वदचे दशक सुरू होताना दूरदर्शन मालिका 'फिर वही तलाश'मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला एनएसडी रिपर्टरी सोडावी लागली आणि तेव्हापासून मी टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी माध्यमांत अभिनय करते आहे. तरीही, रंगभूमी हेच माझं पहिलं प्रेम आहे. रंगभूमी कलाकार असल्याचं समाधान व शो’बिझमुळे मिळत असलेलं नाव, प्रसिद्धी आणि पैसा यांची तुलनाच होऊ शकत नाही. मी नेहमीच रंगभूमीशी असलेली नाळ जपण्यासाठी वेळ काढेन."