'बुरख्याआड लपलेल्या माणसाचा बुरखा...', 'देवमाणूस' किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 06:57 PM2022-09-10T18:57:25+5:302022-09-10T18:57:55+5:30
Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत आली आहे.
मागील काही दिवसांपासून देवमाणूस (Devmanus) मालिका बंद होणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. इतकंच नाही तर प्रेक्षकांचे प्रेमही मिळवले आहे. खरेतर मालिकेच्या कथानकावरून प्रेक्षकांमध्ये नाराजी होती. पण कलकारांवरील प्रेमामुळे ही मालिका बंद करू नका अशी मागणी प्रेक्षक करत होते. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. देवमाणूस मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) देखील मालिका संपणार असल्यामुळे भावुक झालाय. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
किरण गायकवाडने फोटो शेअर करत लिहिले की, नमस्कार ! “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख , होते नीच ; हरामी पिलू तयात एक”. भयाण शांतता मेकउप रूम मध्ये , उर भरून आलेला , डोळ्यांची हलकी किनार ओलावलेली शेवटी ती वेळ आलीच 'निरोपाची' आज रात्री देवमाणूसचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे . उद्यापासून आमची टीम तुमचं मनोरंजन करायला तुमच्यासमोर नसेल . काल गणपती गेले जाताना आपल्या बरोबर देवीसिंग, फेक डॉक्टर , देवमाणूस अशी तोतया माणसं, नकारात्मक माणसं सोबत घेऊन गेले , खरंतर ती या आपल्या आजूबाजूला असतातच गोड बोलून आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात अश्या बुरख्याआड लपलेल्या माणसाचा बुरखा समाजासमोर आणावा तो फाडावा असा आमचा मानस होता. अशी बोलघेवडी माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर आपण वेळीच सावध होऊया. मालिका संपत असताना बर्याच प्रेक्षकांचे फोन, मेसेज येताएत की आम्हाला देवमाणसाचा खूप राग येतो त्याला आम्ही खूप शिव्या ही घालतो. पण ही मालिका बंद नका करू; मालिका संपताना सुद्धा एवढा प्रेक्षकांच प्रेम पाहून भारावून जायला होतं.
त्याने पुढे म्हटले की, डॉ. ला फाशी झाली , त्याची तोंडाला काळ फासून धिंड काढण्यात आली , त्याची किरडी ढासळली...या आणि ज्या महाराष्ट्राच्या इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. देवमाणूस मालिका संपणार असली तरी, या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाबद्दलही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मात्र किरणच्या या पोस्टवरून आता देवमाणूसचा तिसरा सीझन येणार नाही, हे स्पष्टच झाले आहे.