अभिनयात येण्यापूर्वी हे काम करायचा शक्ती आनंद, वाचून तुम्हीही व्हाल आवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 04:19 PM2021-07-01T16:19:45+5:302021-07-01T16:24:30+5:30
करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलताना शक्ती आनंदने सांगितले की, रंगभूमीमुळे मला पटकथालेखन, संवादफेक करणं, अभिनय करणं वगैरे गोष्टी शिकता आल्या, पण सेटवर दररोज नवं काहीतरी शिकायला मिळत असे आणि त्यामुळेच मला अभिनयाचं अधिकच आकर्षण वाटू लागलं.
झी टीव्ही’वरील ‘हमारीवाली गुड न्यूज’ या मालिकेने प्रसारित झाल्यापासूनच प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. कथानकाचा काळ पुढे नेल्यानंतर कथानकाला अनेक नवी वळणे मिळाली आणि त्यामुळे प्रेक्षकांमधील उत्सुकताही वाढली. मालिकेत मुकुंद तिवारीच्या भूमिकेद्वारे नामवंत अभिनेता शक्ती आनंदने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले असले, तरी एके काळी आपल्या अभिनयाच्या छंदाचे रुपांतर पूर्ण वेळच्या व्यवसायात करण्यास शक्ती आनंद प्रचंड गोंधळात होता.
यासंदर्भात शक्ती आनंद म्हणाला, “माझ्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत, मी दिल्लीत एका खाजगी कंपनीत काम करत होतो. तेव्हा मी एका नाटक मंडळीत भरती झालो होतो. याच नाटक मंडळीने माझं आयुष्य घडविण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे. मला अभिनय करायला मनापासून आवडतं. म्हणूनच मी या रंगकर्मींच्या गटात सहभागी झालो होतो.
नोकरीप्रमाणेच मला आयुष्यात काहीतरी सकारात्मक काम करायचं होतं. या रंगकर्मींच्या गटात सहभागी झाल्यानंतर माझ्या अभिनयाला धुमारे फुटले. मी या गटात तब्बल तीन वर्षं होतो. तेव्हाच मला जाणीव झाली की मी अभिनय हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करू शकतो. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो असून मला नाटक-चित्रपटांच्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हतं. तेव्हा मी शून्यातून सुरुवात केली आणि अभिनय म्हणजे काय, ते शिकून घेतलं.”
तो पुढे म्हणाला, “रंगभूमीमुळे मला पटकथालेखन, संवादफेक करणं, अभिनय करणं वगैरे गोष्टी शिकता आल्या, पण सेटवर दररोज नवं काहीतरी शिकायला मिळत असे आणि त्यामुळेच मला अभिनयाचं अधिकच आकर्षण वाटू लागलं. वास्तविक मला रंगमंचावर उभं राहून प्रेक्षकांसमोर बोलण्याची भीती वाटत असे. पण ही भीती घालवून रंगमंचावर आत्मविश्वासाने उभं राहणं ही माझी या क्षेत्रातील फार मोठी कमाई आहे, असं मी समजतो.
कदाचित तेव्हाच माझ्या या छंदाने व्यवसायाचं स्वरूप घेतलं. खरं सांगायचं झाल्यास, माझ्या पहिल्या मालिकेपूर्वी मी अनेक मालिकांसाठी ऑडिशन्स दिल्या होत्या. बरेचदा प्रयत्न केल्यानंतर टीव्ही मालिकांतील माझी वाटचाल सुरू झाली. त्यासाठी मी बराच संघर्ष केला. पण मी अभिनयाला व्यवसाय म्हणून स्वीकारलं, याचा मला आज खूप आनंद होतो कारण त्यामुळेच मला अनेकांचं प्रेम लाभलं आणि जीवनात आनंद फुलला.”