VIDEO: "...तर मी आज कुणीच नसते", हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावनं सांगितली तिच्या आयुष्यातील 'दुर्गा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 02:34 PM2022-09-27T14:34:04+5:302022-09-27T14:35:05+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम' अभिनेत्री नम्रता संभेराव हिनं नवरात्रीच्या निमित्तानं सोमवारी 'सोनी मराठी'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम' अभिनेत्री नम्रता संभेराव हिनं नवरात्रीच्या निमित्तानं सोमवारी 'सोनी मराठी'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. विनोदाच्या क्षेत्रात नम्रतानं आपल्या आगळ्यावेगळ्या शैली आणि टायमिंगनं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. नम्रतानं नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत तिच्या आयुष्याशी निगडीत नवरात्रीच्या आठवणी जाग्या केल्या. तसंच आपल्या आयुष्यातील 'दुर्गा' कोण याचीही माहिती दिली.
"माझी आई हिच माझ्या आयुष्यातील दुर्गा आहे. कारण आज मी तुमच्या भेटीला येतेय. तुमचं मनोरंजन करतेय याचं भाग्य मला माझ्या आईमुळे मिळालं. या क्षेत्रात काम करण्यासाठी तिनं जर मला पाठिंबा दिला नसता तर आज मी कदाचित तुमच्या समोर इथं बसलेले नसते. मी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत दिसले नसते. ती आहे म्हणून मी या क्षेत्रात आहे. यानिमित्तानं मला माझ्या आईला धन्यवाद द्यायचे आहेत. ती माझ्या आयुष्यातील दुर्गा आहे", असं नम्रता संभेराव म्हणाली.
गरोदरपणाच्या काळातील अडचणीत सासूबाईंचा पाठिंबा
आपल्या आयुष्यातील दुसरी दुर्गा म्हणजे सासूबाई असल्याचं सांगताना नम्रता संभेराव हिनं तिच्या गरोदरपणाच्या काळातील आठवण सांगितली. "माझ्या आयुष्यातील दुसरी दुर्गा म्हणजे माझ्या सासूबाई आहेत. लग्न झाल्यानंतर साधरण मुलींना टेन्शन असतं की कसं असणार सासर, घरचे सांभाळून घेतील की नाही, आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यासाठी हातभार लावतील की नाही? असे सगळे प्रश्न असतात. हे सगळं टेन्शन चुटकीसरशी गेलं कारण माझ्या सासूबाईंनी दिलेला पाठिंबा. मी गरोदरपणाच्या काळातही सात महिने काम केलं. सासूबाईंचा जर आधार नसता तर कदाचित मला काम करणं शक्य झालं नसतं. त्यामुळे माझ्या करिअरमध्ये माझ्या सासूबाईंचाही खूप मोठा वाटा आहे. बाळंत झाल्यानंतरही त्या खंबीरपणे पाठिशी उभ्या राहिल्या आणि तू पुढच्या सहा महिन्यात कामाला लागायचं असा पाठिंबा त्यांनी दिला", असं नम्रता संभेराव म्हणाली.
घरात भिंतीवरचं घड्याळ घेण्याची वेळ आलीच नाही, कारण...
नवरात्रोत्सवाच्या आठवणींना उजाळा देताना नम्रतानं एक आगळा वेगळा किस्सा सांगितला. "प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये, चाळीमध्ये गरबा खेळला जातो. प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात. तशाच काही माझ्याही आहेत. मी सुद्धा माझ्या लहानपणी दांडीयाचा मनसोक्त आनंद लुटलेला आहे. कधी नवरात्र येतेय आणि कधी मला नाचायला मिळतंय याची मी अक्षरश: वाट पाहायचे. नऊ दिवस दांडिया खेळायला जायचे आणि दसऱ्याच्या दिवशी बक्षीस समारंभ असायचा. त्या दिवसाची मी खूप वाट पाहायचे. कारण दरवर्षी त्या बक्षीस समारंभाला मला एक घड्याळ मिळायचं. त्यामुळे लहानपणी मला कधीच भिंतीवरचं घड्याळ विकत घ्यायची वेळ आली नाही. कारण बक्षीस म्हणून दरवर्षी घड्याळ घरी यायचं", अशी आठवण नम्रतानं सांगितली.