किरण मानेंचा हा आहे गॉडफादर, म्हणाले - 'एकट्याच्या बळावर लढत इथवर आलोय पण...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:21 AM2023-07-04T11:21:13+5:302023-07-04T11:21:36+5:30
अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर अभिनेता सोशल मीडियावर व्यक्त होत असतात.
अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर अभिनेता सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. किरण माने यांना खरी ओळख मालिकेव्यतिरिक्त छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीमधून मिळाली. दरम्यान आता त्यांनी सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
किरण माने यांनी इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाचा छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हे वर्ष किती झर्रर्रर्रकन निघून गेलं...३ जुलैला, बरोब्बर एक वर्षांपूर्वी सकाळी फोन वाजला. "हॅलो किरणसर, मी एन्डेमाॅलशाईन मधून बोलतेय. बिगबाॅस सिझन चार साठी आम्ही तुमचा विचार करतोय. होकार असेल तर आम्ही उद्या मिटींगसाठी तुम्हाला भेटायला येऊ का?" एक निर्णय. हो म्हणू की नाही? वादळ उठलं मनामेंदूत. बिगबाॅसचं घर लै रिस्की. लै अफवा. कोण म्हणायचं, 'ती शापीत ट्राॅफी घेणार्या प्रत्येकाचं करीयर संपलेलं आहे.'... कोण सल्ला द्यायचं, 'तिथं ठरवून एखाद्याला बदनाम करतात.'... कोण भिती घालायचं, 'आधीच काही लोक टपून बसलेत तुझ्या वाईटावर. त्या माकडांच्या हातात कोलीत देऊ नकोस.'
माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं
ते पुढे म्हणाले की, लै विचार करून म्हन्लं, च्यायला हे चॅलेंज तर घेतलंच पायजे. हे सगळं खोटं ठरवायचा दम हाय आपल्यात. माझ्या चाहत्यांची ताकद जास्त हाय का हितशत्रूंची ते बी जगाला दाखवूया. उतरूया मैदानात. जे हुईल ते हुईल....भावांनो आणि बहिणींनो, या निर्णयानं माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. आधी सर्वांना वाटलं हा लेचापेचाय. दोन आठवड्यात उडवू. पण भलेभले, स्वत:ला धुरंधर समजणारे 'गामा', पालापाचोळ्यासारखे उडवून लावत मी 'टाॅप थ्री'पर्यन्त पोहोचलो. त्या अद्भूत घरातनं बाहेर येताच पब्लीकनं जल्लोषात मला डोक्यावर घेतलं. सातार्यात मिरवणूकीनं जंगी स्वागत झालं. महाराष्ट्रभर सत्कार झाले. अनेक पुरस्कार मिळाले. आजवर बिगबाॅस फक्त शहरी विभागात पाहिलं जायचं. माझ्यासाठी आमचा अख्खा ग्रामीण भाग बिगबाॅस पाहू लागला. माझ्या मातीत 'आपला माणूस' अशी ओळख झाली. थेट महेश मांजरेकरानी सिनेमात घेतलं. 'गोलमाल', 'सिंघम' फेम बाॅलीवूडमधले प्रसिद्ध आर्ट डिरेक्टर नरेंद्र राहुरीकर यांच्या पहिल्या मराठी सिनेमात महत्त्वाची भुमिका केली. एका मोठ्या-भव्यदिव्य आगामी सिरीयलचं शुटिंग सुरू झालं. हे संपलं की एक जबरदस्त नाटक वाट पहातंय. तिन्ही माध्यमांत बिझी झालो. माझ्या बाबतीतल्या आणि बिगबाॅसच्या बाबतीतल्याही सगळ्या अफवा खोट्या ठरल्या.
आजवर मला कुणी गाॅडफादर नव्हता. माझ्या डोक्यावर कुणा बड्या दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा, चॅनलचा हात नव्हता. एकट्याच्या बळावर लढत इथवर आलोय. पण आता म्हणेन, माझा गाॅडफादर कुणी असला तर एकच - 'बिगबाॅस' ! लोकप्रियतेच्या आणि अभिनयक्षेत्राच्या खूप वरच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी जर कुणी मदत केली असेल तर ती फक्त या शो नं... लब्यू बिगबाॅस, असे किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटले.