यंदा पावसाळ्यातही नाट्यव्यवसाय तेजीत, ऑनलाईन तिकिट विक्रीचा नाटकांना फायदा
By संजय घावरे | Published: August 26, 2023 09:11 AM2023-08-26T09:11:35+5:302023-08-26T09:13:09+5:30
तीन वर्षांच्या तुलनेत यंदा मराठी नाटकांना गर्दी
>>संजय घावरे
मान्सून आला की नाट्यव्यवसायाला काहीशी मरगळ येते, पण यंदाचा पावसाळा त्याला अपवाद ठरला आहे. दरवर्षी पावसाळा आला की नाट्यव्यवसायावर मंदीचे सावट येते. यंदा मात्र मान्सूनमध्येही मराठी नाटकांचा व्यवसाय तेजीत असल्याने बऱ्याच नाट्यगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकले आहेत. नवीन येणाऱ्या नाटकांसाठी हा शुभशकून ठरणार आहे.
पावसाळ्यात नाटकांचे प्रयोग करणे कलाकार-तंत्रज्ञांसाठी जिकिरीचे असते. बऱ्याच ठिकाणी पाणी साचते, खड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, कलाकारांनाही विविध समस्यांचा सामना करत नाट्यगृह गाठावे लागते, मुख्यत: कितीही मोठा पाऊस असला तरी न भिजवता सेटची ने-आण करण्याची खूप मोठी कसरत असते, सेट सांभाळून ठेवणे मोठे काम असते. नाट्यकर्मींनी इतकी मेहनत केल्यानंतरही कित्येकदा रसिक पावसात घराबाहेर पडायला कंटाळा करतात आणि त्यांनी पाठ फिरवली की सर्व मेहनत वाया जाते. दरवर्षी हे चित्र असूनही 'शो मस्ट गो आॅन' म्हणत यंदाही भर पावसात नाट्यकर्मींनी कंबर कसली आणि रसिकांनीही नाटकांना गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भर पावसातही काही नाट्यगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकले. एरव्ही शनिवार-रविवारी नाटकांना गर्दी होते, पण 'चारचौघी' या नाटकाचे विकेंडखेरीज अन्य दिवशी असलेले प्रयोगही हाऊसफुल होत असल्याने हे नाटक नवा ट्रेंड सेट करत आहे. सर्वप्रथम उशीरा आलेल्या मान्सूनने नाटकांना सर्वप्रथम दिलासा दिला. त्यानंतर नाट्रयसिकांनी पावसाची तमा न बाळगता नाट्यगृहे गाठत गर्दी केल्याचे नाट्यव्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आॅनलाईनचा फायदा
पूर्वी नाटकांची तिकिटे थिएटरवरच जाऊन काढावी लागायची. त्यामुळे एकदा तिकिटासाठी आणि दुसऱ्यांना नाटक पाहण्यासाठी जावे लागायचे. सध्याच्या आॅनलाईन तिकिट विक्रीमुळे रसिक खूप अगोदर तिकिट काढतात. त्यावेळी नाटकाच्या दिवशी किती पाऊस असेल याचा अंदाज नसतो. बरेचसे रसिक एकदा तिकिट काढल्यावर नाटक पाहण्यासाठी टाळाटाळ करत नाहीत. याचा फायदा नाटकांना होत असल्याचे निर्माते श्रीपाद पद्माकर यांचे म्हणणे आहे.
सध्या रंगभूमीवर
सध्या रंगभूमीवर 'चारचौघी', 'एका लग्नाची पुढची गोष्ट', 'तू तू मी मी', 'व्हॅक्युम क्लीनर', 'संज्या छाया', 'सारखं काहीतरी होतंय', 'पुनश्च हनीमून', 'कुर्रर्रर्र', 'वाडा चिरेबंदी', 'चर्चा तर होणारच', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला', 'करुन गेलो गाव', 'यदा कदाचित रिटर्न्स', 'सुमी आणि आम्ही', 'मी स्वरा आणि ते दोघं', 'सफरचंद', 'नियम व अटी लागू', 'अ परफेक्ट मर्डर', 'खरं खरं सांग', 'देवबाभळी' आदी नाटकांचे सातत्याने प्रयोग सुरू आहेत. या जोडीला प्रिया बापट आणि उमेश कामत यांचे 'जर तरची गोष्ट', 'किरकोळ नवरे', 'ब्रँड अॅम्बॅसेडर', 'मेलो भाव खाऊन गेलो', 'चाणक्य' ही नाटके रंगभूमीवर आहेत.
मान्सूनमधील तीन वर्षांचा नाट्यव्यवसाय
२०२१ - नाट्यगृहे बंद
२०२२ - सरासरी ४०-५०%
२०२३ - सरासरी ६०-७०%
एखादे नाटक हाऊसफुल झाल्यानंतर त्यातून किती गल्ला जमतो हे गणित प्रयोगच्या तिकिटांचा प्लॅन कोणता यावर अवलंबून असतो. ४००-३००-२०० रुपये तिकिटदर असल्यास पावणे तीन लाख ते तीन लाखांपर्यंत आणि ५००-४००-३०० रुपये तिकिटदर असल्यास तीन ते सव्वा तीन लाख रुपये गोळा होतात. शिवाजी मंदिरमध्ये ८७० आसनक्षमता आहे, पण १० सीटस रिझर्व्ह असल्याने ८६० सीटस विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्येही कलाकार-तंत्रज्ञांकडून काही मोफत पासेसही दिले जातात. याचाही प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाच्या कमाईवर परिणाम होतो.
आज ७५ ते ८० टक्के ऑनलाईन तिकिट विक्री होत असून, नाट्यगृहांच्या तिकिट खिडकीवर केवळ २० ते २५ टक्के तिकिटे विकली जातात.
- दिलीप जाधव (निर्माते, अष्टविनाययक)
पावसाळ्यात नाटकांना फारशी गर्दी होत नाही, पण यंदा चांगले बुकिंग मिळत आहे. मागच्या महिन्यात मुंबई-पुण्यासह इतरही ठिकाणी माझ्या नाटकांनी चांगला व्यवसाय केला. पाऊस असला तरी प्रयोग करावेच लागतात. पावसाळ्यात नाट्यगृहांपर्यंत पोहोचणे रसिकांसाठीही कठीण असल्याने ते देखील विचार करतात, पण यंदा सकारात्मक चित्र आहे.
- गोट्या सावंत (नाट्य व्यवस्थापक)
भरत जाधव, प्रशांत दामलेंच्या नाटकांसोबतच अष्टविनायक आणि इतर काही संस्थांच्या नाटकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माझी 'सुमी आणि आम्ही' आणि 'मी स्वरा आणि ते दोघं' ही नाटके जोरात सुरू आहेत. पुढील आठवड्यात १२ ते १५ आॅगस्ट असा मोठा विकेंड असल्याने लोकांचा पिकनिक मूड असल्याने थोडे टफ जाण्याची शक्यता आहे.