'माझा कर्मकांडांवर विश्वास नसला तरी...', हेमांगी कवीची आषाढी एकादशी निमित्त केलेली 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:43 PM2023-06-29T15:43:30+5:302023-06-29T15:44:07+5:30
अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने आषाढी एकादशी निमित्त पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
सध्या संपूर्ण देशात विठ्ठलमय वातावरण झाले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात वारकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण विठ्ठलाच्या भक्ती रसात न्हाऊन गेला आहे. दरम्यान आता अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने आषाढी एकादशी निमित्त पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर तिचा रंगभूमीवरील फोटो शेअर करत लिहिले की, ॥ श्री हरी विठ्ठल ॥ तो तुम्हांला कसा, कुठे, कुठल्या स्वरूपात भेटेल सांगता येत नाही. मला अलिकडेच भेटला! ‘जन्मवारी’ नाटकात. प्रत्येक प्रयोगात त्याचा नामघोष सुरू झाला की अंगावर काटा येतो! कसं काय? माहित नाही. डोळ्यांमधून आपोआप धारा वाहू लागतात! कसं काय? माहित नाही. आत कुठेतरी शांत शांत वाटू लागतं! कसं काय? माहित नाही. काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तरी आपलं मन आपल्याला भेडसावत नाही कारण त्या उत्तरांपेक्षा काहीतरी भारी आपल्याला मिळालेलं असतं!
तिने पुढे म्हटले की, प्रत्येक नाटक, सिनेमा, त्यातली पात्रं तुम्हांला काही ना काही देऊन जातात. या नाटकामुळे माझ्यात असलेली आंतरिक शांतता अजून गडद झाली! आता मन वरवर कितीही ढवळून निघालं तरी तळाशी निश्चल, निर्विकार असल्याचं जाणवतं! माझा कर्म कांडांवर विश्वास नसला तरी माझ्या आत मला हे जे काही भारी भारी जाणवतं त्यावर विश्वास आहे. त्याला काय म्हणतात मला माहित नाही! जेव्हा कळेल तेव्हा बघू! काही घाई नाही. तोपर्यंत पावसाच्या सरींप्रमाणे त्याच्या नामघोषासमवेत या अद्भूत जाणिवेत न्हाऊन घेतेय! नाटकातल्या ‘मंजी’ या पात्रासारखंच मला छान वाटतं, मोकळं वाटतं, हलकं हलकं वाटतं! आषाढी एकादशीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा!
हेमांगी कवीने तिच्या नाटकाच्या पुढील प्रयोगाची वेळ, तारीख आणि ठिकाणदेखील पोस्टमध्ये सांगितली आहे.
जन्मवारीचे पुढील प्रयोग -
शनि. १ जुलै रा. ८.३० वा. आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण
रवी. २ जुलै सा. ५.३० वा. रामकृष्ण मोरे, पिंपरी चिंचवड
मंगळ. ४ जुलै दु. ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
रवी. ९ जुलै रा. ८.३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
सोम. १० जुलै दु. ४ वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले