'जातीभेदाची कीड नष्ट करायला...', किरण मानेंची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 02:20 PM2023-06-26T14:20:04+5:302023-06-26T14:20:37+5:30

अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर अभिनेता सोशल मीडियावर व्यक्त होत असतात.

'To destroy the pest of caste discrimination...', Kiran Mane's 'she' post on social media is in discussion | 'जातीभेदाची कीड नष्ट करायला...', किरण मानेंची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

'जातीभेदाची कीड नष्ट करायला...', किरण मानेंची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर अभिनेता सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. दरम्यान आता त्यांनी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या महामानवाला मानाचा मुजरा केला आहे.

किरण माने यांनी इंस्टाग्रामवर शाहू महाराज यांचा फोटो शेअर करत लिहिले की, महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत....सांगलीचे लै फेमस वकील गणपतराव अभ्यंकर एकदा राजर्षी शाहू महाराजांबरोबर रथातनं चाललेवते. बोलता-बोलता त्यांनी महाराजांना सुनावले....शाहू महाराज सत्तेवर येण्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या, महत्त्वाच्या जागा सधन उच्चवर्गीय लोकांनाच दिल्या जायच्या. महाराजांनी मात्र खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मोठ्या पदाच्या नोकर्‍या द्यायला सुरूवात केली होती. त्यावर नाराज होऊन गणपतरावांनी हा आरोप केला होता.

 खास सवलती नको का द्यायला???
त्यांनी पुढे सांगितले की, ...महाराज गप्प बसले. काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हन्ले, "चंदी आन रं." त्यानं आणलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले. त्याबरोबर हरभरे खायला सगळी घोडी पळत आली. जी दांडगी, तगडी होती, ती लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगरं आन् म्हातारी मागं र्‍हायली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही. महाराज म्हन्ले, "बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि 'लायक' होती त्यांनीच समद्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आनि अशक्त उपाशीच र्‍हायली का नाय? म्हनून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो. तसं चारल्याशिवाय ती सशक्त हुनारंच न्हाईत... मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आनायला काय करायला पायजे? खास सवलती नको का द्यायला???"

इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली
अशा विचारांचा राजांचा राजा, लोकराजा सत्तेवर असताना गोरगरीबांना काय कमी पडणार होतं? आवो, इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली. माझ्या शाहूच्या राज्यात उच्चवर्गीयांच्या मांडीला मांडी लावून बसून अस्पृश्य - बहुजनांतील मुलंमुली शिक्षण घ्यायला लागली ! ...फासेपारधी-मातंग-गारूडी समाजातल्या लोकांना राजदरबारी नोकर्‍या दिल्या गेल्या. त्यांना कामधंदे सुरू करायला शाहूराजांनी खिशातले पैसे दिले ! ...जातीभेदाची कीड नष्ट करायला आंतरजातीय विवाह लावले गेले...विधवाविवाह-स्त्रियांना शिक्षण, त्यांचे सबलीकरण यावर भर दिला गेला !, असे मानेंनी पोस्टमध्ये म्हटले.

कोवळ्या वयाच्या भिमरावामधनं, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं भारतरत्न घडवण्यात शाहूमहाराजांचा सिंहाचा वाटा होता ! "शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधारस्तंभ होते." असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ते उगाच नाही. या देशातला समतेचा पाया भक्कम करणार्‍या महामानवाला मानाचा मुजरा करणारी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.

Web Title: 'To destroy the pest of caste discrimination...', Kiran Mane's 'she' post on social media is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.