'ईमली' मालिकेच्या सेटवर वीजेच्या झटक्यामुळे क्रू मेंबरचा मृत्यू; उपचारांपूर्वीच झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 11:26 AM2023-09-20T11:26:41+5:302023-09-20T11:28:57+5:30
Imlie: महेंद्र असं निधन झालेल्या क्रू मेंबरचं नाव आहे. ते गेल्या बऱ्याच काळापासून या मालिकेसाठी काम करत होते.
सध्या सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. त्यामुळे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. परंतु, एकीकडे आनंदोत्सव साजरा होत असतानाच हिंदी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ईमली मालिकेतील एका क्रू मेंबरचं अपघाती निधन झालं आहे.
मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या दादासाहेब फाळके फिल्मसिटी येथे ईमली मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. मालिकेतील एका क्रू मेंबरला वीजेचा झटका लागल्यामुळे निधन झालं आहे. हा वीजेचा झटका इतका तीव्र होता की त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत वाटेमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या तरी या घटनेविषयी मालिकेच्या टीमकडून किंवा चॅनेलकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
महेंद्र असं निधन झालेल्या क्रू मेंबरचं नाव आहे. ते गेल्या बऱ्याच काळापासून या मालिकेसाठी काम करत होते. २८ वर्षीय महेंद्र यांना काही दिवसांपूर्वीही याच मालिकेच्या सेटवर वीजेचा झटका लागला होता. महेंद्र यांनी यापूर्वीच त्यांच्या सहकर्मचाऱ्यांना त्या जागेविषयी आधीच सूचना दिली होती. त्यामुळे तेथे कोणालाही न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. परंतु, याच ठिकाणी १९ सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांना झटका लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर बराच काळ मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. सेटवरील या धोकादायक जागेविषयी माहित असतानाही महेंद्र त्या ठिकाणी का गेला?त्या नेमका झटका कसा लागला याविषयी अद्याप तरी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. ईमली ही स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका टीआरपीमध्ये कायम पहिल्या ५ मध्ये असते. या मालिकेच्या पहिल्या भागात मराठी अभिनेता गश्मीर महाजनी, सुंबुल तौकिर खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. नुकताच या मालिकेचा दुसरा सिझन संपला असून तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.