ट्रेंड वेब सीरिजचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 03:52 AM2018-08-14T03:52:05+5:302018-08-14T03:52:27+5:30
4 जी क्रांतीमुळे इंटरनेटचा वेग वाढला. सर्वांच्या मोबाइलवर लाइव्ह स्ट्रिमिंग (थेट प्रक्षेपण) पाहणे सहजसुलभ झाले. परिणामी भिंतीवरचा टीव्ही हातात आला. आपल्याला जी वाहिनी आणि जो कार्यक्रम बघायचा आहे, तो आपण आपल्या मोबाइलवर कधीही आणि कुठेही पाहण्याची सोय उपलब्ध झाली. त्यातूनच सध्या तेजीत आलाय वेब सीरिजचा ट्रेंड...
- रवी सपकाळे
इडिएट बॉक्सवर त्याच त्या सास-बहू छाप मालिका, तीच कटकारस्थाने, पुनर्जन्म आणि त्याच त्या संवादाने गुळगुळीत झालेल्या सीरियल्स डोकं बाजूला काढून पाहत बसणे; हे आजच्या युगातील तरुणाईला मान्य नाही. मुळात टीव्हीचा ताबा घरातील महिलावर्गाकडेच असतो, त्यातून दिवसभरात अधूनमधून त्याच्यावर लहान मुलं हक्क गाजवतात. तुम्हाला जर एखादी महत्त्वाची मॅच बघायची असेल किंवा बातम्या बघायच्या असल्यास त्यांची मिनतवारी करावी लागते किंवा मग मन मारून ते बघत असतील तेच चॅनेल आणि तोच कार्यक्रम पाहावा लागतो आणि रिमोटला हात लावण्याचा तर विचारदेखील करवत नाही. अगदी बे्रक आला तरी चॅनल बदलू देत नाहीत, ही मंडळी जणू त्या दाखविण्यात येणाऱ्या जाहिराती यादेखील त्यांच्या कार्यक्रमाचा भाग आहे आणि ते त्यांना न बघून अगदी चालणारच नाही.
मनोहर श्याम जोशी लिखित ‘हम लोग’ ही भारतीय दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेली पहिली मालिका. ७ जुलै १९८४ रोजी तेव्हाच्या एकमेव ‘दूरदर्शन’वर ती सुरू झाली. १९८०च्या दशकातील भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा होती. त्यांचा दैनंदिन संघर्ष आणि आकांक्षा याचे चित्रण यात होते. अशोककुमार यांनी यात सूत्रधाराची महत्त्वपूर्ण भूमिका साकार केली होती. त्या काळात या मालिकेने सर्व भारतीय प्रेक्षकांवर अक्षरश: गारुड केले.
तंत्रज्ञानाची क्रांती होताच टीव्ही- मनोरंजन क्षेत्रात झपाट्याने बदल झाले. अनेक नवनवीन वाहिन्या सुरू झाल्या आणि विविध विषयांवरील मालिकांची संख्या वाढू लागली. मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होऊ लागले. आजच्या घडीला जवळपास ४००पेक्षा अधिक टीव्ही चॅनल आहेत आणि त्यावर २४ तास विविध कार्यक्रमांचा रतीब अहोरात्र सुरूच असतो.
वर्षानुवर्षे चालणाºया प्रदीर्घ मालिकांचे वेड आता कमी होऊ लागले आहे. तरुणांत त्याच त्या रडक्या आणि रटाळ मालिकांपासून मुक्त होत त्यांना अपील होतील, असे कार्यक्रम पाहण्याचा कल वाढू लागला. आताचा काळ त्याच्याही पुढे गेला आहे, सीरियलऐवजी वेब सीरिज ट्रेंडमध्ये आहेत.
एखादं कथानक घेऊन त्याच्या आठ ते दहा एपिसोडची एक सीरिज, अशी ही रचना. त्याच्या वेगवेगळ्या मालिका सध्या इंटरनेटवर आहेत. त्यासाठीचे अॅप लोकप्रिय होत आहेत. त्यासाठी इंटरनेटसोबत अॅपचे पैसे भरून त्या पाहिल्या जातात. साधारणत: एका एपिसोडचा कालावधी २० मिनिटे ते १ तास
असा असतो.
अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक वेब सीरिज तयार करीत आहेत. जगाच्या व्यासपीठावर त्या सादर होत असल्याने तेथील तीव्र स्पर्धेला तोंड देताना तसा दर्जाही राखावा लागतो. सेन्सॉर बोर्डाच्या नियमांमुळे अनेक वेळा मालिकेतील दृश्ये आणि संवादांना कात्री लावावी लागते. ते बंधन वेब सिरीजला सध्या तरी नाही. या कारणामुळे त्यात दाखविण्यात येणारी हिंसा, नग्नता, रक्तपात, अर्वाच्च शब्दांचा वारेमाप वापर यावरून टीका, मत-मतांतरे सुरू आहेत. तरीही यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोकळेपणा, स्वातंत्र्य, विषयांच्या निवडीतील वैविध्य, मांडणीतील ताजेपणा आणि मोबाइलवर ही मालिका पाहिली जाणार आहे याचा विचार करून केलेली तिची रचना हेच कदाचित याच्या यशामागचे एक कारण असू शकते.
एखादी दीर्घ कादंबरी वाचण्यापेक्षा अनेकदा कथासंग्रह वाचण्यावर बहुतेकांचा कल असतो, ज्यामुळे एकच एक गोष्ट बराच वेळ वाचण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांवरील लहान-लहान कथा आपल्याला वाचायला मिळतात, तसेच काहीसे वेब सीरिजेसचे आहे. छोट्या-छोट्या एपिसोडमधून विविध कथा आपणास पाहायला मिळतात. व्हिडीओ आॅन डिमांडच्या या व्यासपीठावर जगभरात तयार होणाºया विविध भाषांतील वेब सीरिज उपलब्ध आहेत, त्यातही काही प्रमुख आणि सर्वाधिक पाहण्यात येणाºया वेब सीरिज इंग्रजी किंवा इतर प्रमुख प्रादेशिक भाषेतील सबटायटलसहित किंवा अनेक विविध प्रादेशिक भाषेत डब केलेल्या मालिका पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यातून जागतिक दर्जाचे कार्यक्रमही आपल्याला पाहता येतात.
वेब सीरिजला मिळणारा प्रतिसाद, वाढते प्रेक्षकवर्ग यामुळे दर्जेदार वेब सीरिज तयार करण्याकडे दिग्दर्शकांचा ओढा आहे. अनेक विषय जे मुख्य प्रवाहातील माध्यमाद्वारे व्यक्त किंवा प्रदर्शित करता येऊ शकत नाहीत, त्यासाठी वेब सीरिज हा एक चांगला पर्याय आहे आणि आता यासाठीही अनेक मानाचे असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि पुरस्कार सोहळे होत आहेत, यामुळे चुरस वाढली आहे आणि प्रेक्षकांना नवा पर्याय मिळतो आहे.