'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान, लग्नाचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:30 IST2024-12-13T08:28:42+5:302024-12-13T08:30:24+5:30
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्री विरीशा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. विरीशाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान, लग्नाचे फोटो आले समोर
सध्या कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या घरी लगीनघाई सुरू आहे. रेश्मा शिंदे, निखिल राजेशिर्के या कलाकारांनंतर आता टेलिव्हिजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्री विरीशा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. विरीशाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत चंचला ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विरीशाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. विरीशाने अभिनेता प्रशांत निगडेसह कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत गुरुवारी(१२ नोव्हेंबर) सात फेरे घेतले. पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. विरीशाने लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी नेसून पारंपरिक थाट केला होता. तर धोतर आणि फेटामध्ये प्रशांत राजबिंडा दिसत होता. लग्नानंतर विरीशा आणि प्रशांतचं रिसेप्शनही पार पडलं.
विरीशाने अनेक मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. तर तिचा पती प्रशांत अभिनेता असण्याबरोबरच लेखक, दिग्दर्शकही आहे. प्रशांतनेदेखील काही मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘स्वाभिमान’ मालिकेत त्याने ‘बबन’ ही भूमिका साकारली होती. सध्या तो ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत ‘रॉकेट’ची भूमिका साकारत आहे.