Dolly Sohi: टीव्ही अभिनेत्री डॉली सोहीचं सर्व्हिकल कॅन्सरने निधन, काल रात्रीच बहिणीचाही झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 08:57 IST2024-03-08T08:56:24+5:302024-03-08T08:57:32+5:30
डॉली सोही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच पॉझिटिव्ह राहायची. ती मोठ्या हिंमतीने सर्व्हिकल कॅन्सरशी लढा देत होती.

Dolly Sohi: टीव्ही अभिनेत्री डॉली सोहीचं सर्व्हिकल कॅन्सरने निधन, काल रात्रीच बहिणीचाही झाला मृत्यू
टीव्ही अभिनेत्री डॉली सोही (Dolly Sohi) हिचं निधन झालं आहे. वर्षभरापासून ती सर्व्हिकल कॅन्सरचा (Cervical Cancer) सामना करत होती. काही दिवसांपूर्वीच तिला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. कुटुंबियांनी डॉलीच्या निधनाची माहिती दिली आहे. आज दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दु:खद बाब म्हणजे डॉलीची बहीण अमनदीप सोहीचंही काल रात्रीच निधन झालं. ती जाँडिसच्या आजाराने त्रस्त होती.
दोन आठवड्यांपूर्वीच डॉलीने रुग्णालयात दाखल झाल्यावर माझ्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती चाहत्यांना केली होती. तसंच पूनम पांडेच्या सर्व्हिकल कॅन्सरने निधनाच्या अफवेवरही तिने नाराजी दर्शवली होती. डॉली तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रीय होती. नेहमी सकारात्मक राहण्याचे संदेश ती पोस्टमधून द्यायची. मात्र सर्व्हिकल कॅन्सरने तिचे आज प्राण गेले.
डॉली सोही 'झनक' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारत होती. कॅन्सरमुळेच तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. 'झनक' मालिकेशिवाय डॉलीने आतापर्यंत अनेक डेली सोपमध्ये काम केले आहे. 'कलश', 'देवो के देव महादेव', 'झाँसी की रानी','मेरी आशिकी तुमसे ही','एक था राजा एक थी रानी' यासह अनेक मालिकांचा समावेश आहे. बऱ्याच काळापासून डॉली टेलिव्हिजन विश्वात काम करत आहे.