देशाची वाढती लोकसंख्या पाहता अभिनेत्रीने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:25 AM2024-08-12T11:25:58+5:302024-08-12T11:27:29+5:30

या निर्णयामुळे अभिनेत्रीचे नवऱ्यासोबत झाले मतभेद पण...

Tv actress Jayati Bhatia decided not to give birth to child because of increasing population | देशाची वाढती लोकसंख्या पाहता अभिनेत्रीने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय, म्हणाली...

देशाची वाढती लोकसंख्या पाहता अभिनेत्रीने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय, म्हणाली...

टीव्हीवर अनेक हिंदी मालिकांमध्ये दिसणारी लोकप्रिय अभिनेत्री जयति भाटिया (Jayati Bhatia). त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये कणखर भूमिका साकारल्या आहेत. मालिकाच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही उत्कृष्ट काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजमध्ये त्या झळकल्या. माझी आवडती अभिनेत्री असा भन्साळींनी त्यांचा उल्लेख केला होता. जयति भाटिया यांनी खऱ्या आयुष्यात मूल न होऊ देण्यामागचं कारण सांगितलं जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.  'टेली मसाला' ला अभिनेत्रीने नुकतीच मुलाखत दिली ज्यात त्यांनी हा खुलासा केला.

जयति भाटिया यांना मनोरंजनसृष्टीत करिअरला सुरुवात करुन बरीच वर्ष झाली आहेत.  12 मार्च 1992 रोजी त्यांनी थिएटर आर्टिस्ट किरण भाटिया यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आहेत. मात्र आजपर्यंत त्यांनी मूल होऊ दिलं नाही. याचं कारण सांगताना जयति भाटिया म्हणाल्या, "आजकालच्या तरुणांमध्ये पॅशन आणि एक वेडेपण असतं. मी सुद्धा आयुष्यात अनेक निर्णय घेतले. त्यातलाच एक म्हणजे कधीच मूल होऊ न देण्याचा निर्णय. या निर्णयामुळे सुरुवातीला माझे पतीसोबत मतभेद झाले. मात्र नंतर आमची भांडणं मिटली. माझ्या सासू माझ्याकडे आशेने पाहायच्या पण मी माझ्या निर्णयावर आजपर्यंत ठाम आहे. आई न होऊनही मी खूश आहे."


त्या पुढे म्हणाल्या,'देशात लोकांना कितीतरी अडचणी आहेत. नोकऱ्या नाहीत, काही लोकांना शिक्षणही परवडत नाही. याचं कारण देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे. भारतीय नागरिक म्हणून पाहिलं तर आपल्या देशात खूप जास्त लोकसंख्या आहे. हे पाहूनच मी आणि पतीने हे ठरवलं की आता लोकसंख्या वाढवायला नको. माझा हा निर्णय देशासाठी माझं एक योगदान आहे. दोन जण एकत्र आले म्हणजे त्यांनी मूल केलंच पाहिजे हे गरजेचं नाही. दोन लोकांचं मिलन केवळ या कारणासाठी नसलं पाहिजे. आजच्या काळात तर मूल जन्माला घालण्यासाठी महिला आणि पुरुषाने एकत्र येणंही गरजेचं नाहीए. सरोगसी आणि आयव्हीएफ सारखे पर्याय आहेत. जर स्त्रीने स्वत: जन्म नाही दिला तर याचा अर्थ हा नाही की तिच्यात भावना नाहीत. "

जयती भाटिया यांच्या या निर्णयावर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. 'तुम्ही निर्णय घेतल्याने असा काय मोठा फरक पडला', 'हाच विचार असता तर आयव्हीएफ सारखं तंत्रज्ञान आलं नसतं' अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. तर काही जणांनी त्यांच्या या निर्णयाला सहमतीही दर्शवली आहे. 

Web Title: Tv actress Jayati Bhatia decided not to give birth to child because of increasing population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.