"एक महिना स्वत:ला खोलीत बंद केलं...", वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट, जुळ्या मुलांची आई आहे ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:40 IST2025-02-07T16:39:03+5:302025-02-07T16:40:37+5:30
वयाच्या १६ व्या वर्षीच तिचं लग्न झालं होतं. १७ व्या वयात तर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि १८ व्या वर्षी तिचा घटस्फोटही झाला होता.

"एक महिना स्वत:ला खोलीत बंद केलं...", वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट, जुळ्या मुलांची आई आहे ही अभिनेत्री
'कसौटी जिंदगी की' टीव्ही मालिकेत दिसलेली खलनायिका अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) आठवतेय? तिने मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारली होती जी आजही लोकप्रिय आहे. दिसायला सुंदर तितकीच तिखट अशी तिची भूमिका होती. उर्वशीला या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यापूर्वी उर्वशीने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. वयाच्या १६ व्या वर्षीच तिचं लग्न झालं होतं. १७ व्या वयात तर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि १८ व्या वर्षी तिचा घटस्फोटही झाला होता.
उर्वशी ढोलकिया वयाच्या १८ व्या वर्षी जुळ्या मुलांची आई आणि घटस्फोटित होती. नुकतंच 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत ती आयुष्याच्या त्या प्रसंगांविषयी म्हणाली, "खूप कठीण होतं. मला माझ्या मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये घालावं लागलं. हा माझ्या आईचा निर्णय होता. मी कामामुळे त्यांना वेळ देऊ शकणार नव्हते. ते बेशिस्त झाले असते. त्यांना शिस्त लावण्यासाठी बोर्डिंग स्कूलला घालणंच योग्य आहे असा सल्ला आईने दिला होता. मीही मान्य केलं. पण मुलं जवळ नसल्याने मी रोज रडत होते. मग कळलं की आईचा निर्णय एकदम योग्य होता. माझी मुलं खूप चांगल्या प्रकारे वाढली."
"माझी मुलं कधीच वडिलांबद्दल विचारत नाहीत. मीच उलट त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचे पण ते म्हणायचे आम्हाला ऐकायचंच नाही. तसंच ते कधी वडिलांना भेटलेही नाहीत. दोघंही दीड वर्षांचे असल्यापासून त्यांच्या वडिलांचा आणि आमचा संपर्कच नाही. मी वयाच्या १८ व्या वर्षी माझ्या मुलांची आई, बाबा सगळंच होते. घटस्फोटाचा नक्कीच मलाही खूप त्रास झाला होता. मी एक महिना स्वत:ला खोलीत बंद करुन घेतलं होतं. जे झालं ते बदलू शकत नाही पण आता पुढे काय करायचं हा विचार मी केला. मी स्वत:ला सगळ्यांपासून दूर केलं होतं. माझ्याकडे पैसेही नव्हते. आईवडिलांवर भारही द्यायचा नव्हता. पण माझे आई-वडील नसते तर मी काय केलं असतं माहित नाही. आज मी या स्टेजपर्यंत त्यांच्यामुळेच पोहोचले आहे."