'बाळूमामाच्या नावाने चांगभलं'मध्ये येणार श्रीरामाची प्रचिती; प्रेक्षकांना अनुभवता येणार नवा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 07:05 PM2024-01-18T19:05:34+5:302024-01-18T19:07:24+5:30
Balu Mamachya Navane Changbhal: बाळूमामांच्या चरित्रातली नवीन कथा आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सध्या सगळे देशवासी प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी करत आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपआपल्या परीने शक्य होईल तसा हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या दिवसाचा उत्साह आता मालिकाविश्वामध्येही पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत प्रभू श्री रामाची प्रचिती पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका आज लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. बाळूमामांच्या चरित्रावर आधारित या मालिकेत एक विशेष कथा पाहायला मिळणार आहे. मेंढ्यांना घेऊन सतत भ्रमण करत असलेल्या बाळूमामांना प्रत्येक पावलावर वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात. पण, मामा कायम शांतपणे त्या माणसांच्या स्वभावात अपेक्षित बदल घडवून आणतात. इतकंच नाही तर त्यांच्या या चमत्कारातून ते वेळोवेळी लोकांना त्यांच्या सत्याची प्रचितीही करुन देतात. या सगळ्या प्रवासात असंख्य लोकांचं आयुष्य त्यांनी बदललं आहे. बाळूमामांच्या चरित्रातली अशीच एक कथा आता पाहायला मिळणार आहे.यामध्ये श्री प्रभूरामचंद्र यांची प्रचिती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
या कथेतील एका जोडप्याच्या घरी चालत असलेल्या रीतीप्रमाणे श्री रामाचा उत्सव असतो. नवरा कट्टर रामभक्त असून बायको बाळूमामांची भक्त असते. या उत्सवात येण्यासाठी ती बाळूमामांना निमंत्रण देते. परंतु, नवरा श्री रामाच्या उत्सवासाठी खूप उत्साही व आग्रही असतो हे बाळूमामांना देखील जाणवतं. अशा परिस्थितीत पत्नीची मात्र दुविधा मनस्थिती होते. या राम भक्ताला बाळूमामा श्री रामाची प्रचिती देणार आहेत.त्यामुळे या नव्या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना बाळूमामांचा नवा अनुभव अनुभवता येणार आहे.