'अभिनय तुझ्यासाठी नाही'; 'त्या' एका वाक्यामुळे खचली होती अक्षया,पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:03 IST2022-02-11T19:01:51+5:302022-02-11T19:03:37+5:30
Akshaya naik: लतिका या भूमिकेच्या माध्यमातून अक्षया अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे आज तिचा स्वतंत्र मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

'अभिनय तुझ्यासाठी नाही'; 'त्या' एका वाक्यामुळे खचली होती अक्षया,पण...
छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत सध्या अक्षया, लतिका ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेच्या माध्यमातून अक्षया अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे आज तिचा स्वतंत्र मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, एकेकाळी कलाविश्वात येण्यापूर्वी अक्षया प्रचंड खचून गेली होती. अभिनय तुझ्यासाठी नाहीच या एका वाक्यामुळे अक्षया खचलेली होती. मात्र, तिच्या आईमुळे तिला आत्मविश्वास मिळाला आणि आज ती या कलाविश्वात तिच्या अभिनयाच्या डंका वाजवत आहे.
कलर्स मराठीने अक्षयाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया करिअरच्या सुरुवातीला तिला कशाप्रकारे चढउतारांना सामोरं जावं लागलं आणि तिच्या आईने तिची कशी साथ दिली हे सांगितलं आहे.
समुद्रकिनाऱ्यावर शॉर्ट ड्रेसमध्ये लतिकाने केला डान्स; वर्सोवा बीचवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
"अगदी सुरुवातीच्या काळात मी एका थिएटरच्या ग्रुपमध्ये होते. त्यावेळी मला काही गोष्टी जमायच्या, काही जमत नव्हत्या. तेव्हा मला आमच्या ग्रुपमधल्या एका व्यक्तीने मला असं सांगितलेलं की, अभिनय तुझ्यासाठी बनलाच नाहीये तू सोड. तू या ग्रुपमध्ये नसलीस तरी आम्हाला फारसा फरक पडणार नाही. त्याच्या या वाक्याने मी खूप खचले. कारण, ती एकच गोष्ट होती जी मला येत होती आणि मला त्यातच करिअर करायचं होतं", असं अक्षया म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्या व्यक्तीच्या बोलण्यानंतर मी लगेच आईला फोन केला आणि काय झालं ते सांगितलं. त्यावर तू घरी ये मग बोलू असं आईने सांगितलं. त्यानंतर घरी गेल्यावर मी घडलेला प्रसंग सांगितला. पण, त्यावेळी आईने मला जो कॉन्फिडन्स दिला. त्यामुळेच मी आज इथे आहे. आज भलेही त्या गोष्टी आपल्याला येत नसतील. पण, त्या शिकायचा स्कोप आपल्याकडे आहे. पुढे जाऊन अशा अनेक गोष्टी असतील ज्या तुला येतील, त्या इतरांना येणार नाहीत.आपण खचायचं नाही."
दरम्यान, आईच्या या वाक्यामुळे मला बळ मिळालं आणि मी पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली असं अक्षयाने सांगितलं. विशेष म्हणजे अक्षया अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.