'आई तुळजाभवानी'मधील उमा आणि तुळजाची गोड मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:59 PM2024-11-18T16:59:40+5:302024-11-18T17:00:14+5:30

Aai Tulja Bhavani :'आई तुळजाभवानी' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ही मालिका विशेषत: देवी तुळजाभवानी आणि उमा यांच्या अनोख्या नात्याच्या प्रवासामुळे विशेष गाजत आहे.

Uma and Tulja's sweet friendship in 'Aai Tulja Bhavani' | 'आई तुळजाभवानी'मधील उमा आणि तुळजाची गोड मैत्री

'आई तुळजाभवानी'मधील उमा आणि तुळजाची गोड मैत्री

कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' (Aai Tulja Bhavani) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ही मालिका विशेषत: देवी तुळजाभवानी आणि उमा यांच्या अनोख्या नात्याच्या प्रवासामुळे विशेष गाजत आहे. उमाचे रुसवे-फुगवे संपवून आता आई तुळजाभवानीने आपल्या प्रेमाच्या शक्तीने उमाचा राग वितळवला आहे. ज्यामुळे उमा आणि तुळजामधले नाते अधिकच घट्ट झाले आहे. तुळजाभवानी आणि उमाच्या नात्यातील नाजूक क्षण पाहून प्रेक्षकांच्या मनात या दोघींवर असलेले प्रेम अधिकच वाढू लागले आहे. प्रत्येक भागात उमा आणि तुळजा मधील भावुक प्रसंग आणि गोड संवाद ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत बघायला प्रेक्षकांना आवडते आहे. उमा आणि तुळजा म्हणजेच बिल्वा आणि पूजामध्ये ऑफस्क्रीन देखील मालिके पलीकडे खूप सुंदर नाते निर्माण झाले आहे.

पूजा बिल्वाबद्दल सांगताना म्हणाली, खरंतर आई तुळजाभवानी मधले हे माझं पहिलेच अभिनयाचे काम आहे. सगळेच नवीन आहे. खूप काही गंमती घडतायत,सगळ्याचा आनंद घेत मजा करतोय आम्ही सगळेच, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकायला मिळतंय. आता ही उमा… उमा म्हणजे एनर्जीचा स्त्रोत आहे. आपण म्हणतो ना एखादं लहान मुल आपल्या घरी असावं तसं एक लहान मुल सेटवर असावे… सतत नाचत बसणार, उड्या मारणार. सतत कोणा न कोणाची कळ काढणारच. मला कधी कधी वाटतं की स्वर्गात जर नारदमुनी नसते तर काय झाल असतं तर जगायला गंमतच आली नसती. तर सेटवर उमा म्हणजे तो कळीचा नारद आहे. 

बिल्वामुळे गोड छोट्या मैत्रीचं सुख मिळालंय

ती पुढे म्हणाली की, एक प्रसंग मला आठवतो, जेवताना बिल्वा नेहमी माझ्या बाजूलाच बसते. पण एकेदिवशी मी तिच्या बाजूला बसले नव्हते आणि ती चिडली. मालिकेतला प्रसंग पण असाच लिहून आला ही उमा देवीवरती चिडते. बरं ह्या बाईसाहेब माझ्यावरती चिडल्या आहेत हे मला माहिती नाही. तिने जो काय राग त्या सीन वरती काढला. त्या सीनच्या शेवटी ती मला मिठी मारते आणि म्हणते की तू कधीच सोडून नको जाऊस. तिने मिठी मारली तिच्या डोळ्यात पाणी होतं...माझ्याही डोळ्यात पाणी आलं. इतकी गोड आहे ही, तिने असं काहीतरी केल्यानंतर कसं या मुलीवर रागवायचं सांगा. असं वाटतं तू बोलतच राहा मी ऐकतच राहते. खूप खूप खूप प्रेम वाटते. एक नातं निर्माण झालंय. खरंतर मी म्हणेन उमा मुळे देवीला मातृत्वाचे सुख मिळाले आणि पूजाला बिल्वामुळे गोड छोट्या मैत्रीचं सुख मिळाले.

आमच्यात घट्ट मैत्री निर्माण झालीय- बिल्वा

तर बिल्वा म्हणाली, पूजा ताईने सांगितलं ना तसंच सेम मला पण वाटते. मला वाटतं रोज शूटिंग असावे. रोज पूजाताई बरोबर सीन असावा आणि मी काही कळ वगैरे काढत नाही. म्हणजे सीन लागलेला नसताना पण सीन लागलाय असं जाऊन पूजा ताईला सांगणं याला कळ वगैरे म्हणत नाही. याला आपली छोटीशी मजा म्हणतात. म्हणजे एकदा असंच झालं. एकदा मला खूप भूक लागली. तर मी एकटीने खाऊन घेतलं. जेवणाच्या ब्रेकला मी मेकअपरूम मध्ये बसले होते. पूजाताईने मला खूप शोधलं मी सापडलेच नाही. मग ती जेवलीच नाही. मला कळलं त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. पूजाताई माझ्याबद्दल सरांना तक्रार करते. पण तिचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझे पण तिच्यावर. त्यादिवशी मी रडले. मग आता आमच्या दोघांचं पण सेम सेम रडून झालंय. म्हणून आमच्यात अशी घट्ट मैत्री निर्माण झाली आहे. जी मला खूप आवडते. ती मला समजून घेते. कधी कधी ओरडते.  

Web Title: Uma and Tulja's sweet friendship in 'Aai Tulja Bhavani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.