कपिल शर्माची आत्या उपासना सिंग दिसणार या मालिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 03:18 PM2018-08-02T15:18:41+5:302018-08-02T15:24:04+5:30
जिजाजी छत पर है या मालिकेत आता एका नव्या कलाकाराची एंट्री होणार आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात कपिल शर्माच्या आत्याच्या भूमिकेत झळकलेली उपासना सिंग लवकरच या मालिकेत प्रवेश करणार आहे.
सोनी सबच्या जिजाजी छत पर है या मालिकेला भरघोस लोकप्रियता लाभली आहे. या मालिकेत आता एका नव्या कलाकाराची एंट्री होणार आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात कपिल शर्माच्या आत्याच्या भूमिकेत झळकलेली उपासना सिंग लवकरच या मालिकेत प्रवेश करणार आहे. पंचमच्या आईच्या भूमिकेत ती दिसणार आहे. पंचमची ही आई म्हणजेच बेबे अतिशय उत्साही आहे. मात्र, ती सतत चिंताही करत असते आणि जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल तिला उत्सुकता असते. बेबेला सर्वात सुंदर सून हवी आहे आणि तिच्याशी खोटं बोलणारी माणसं तिला अजिबात आवडत नाहीत.
मालिकेच्या येत्या भागांमध्ये पंचम (निखिल खुराना) एका संकटात सापडणार आहे. विचित्र परिस्थिती उद्भवल्यामुळे स्वतःचं लग्न झाल्याची थाप त्याला बेबेला मारावी लागते. ते ऐकल्यावर सुरुवातीला बेबेला वाईट वाटतं, आपल्याला आणि कुटुंबाला कुठलीही माहिती न देता त्याने आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेऊन टाकल्याने ती दुखावली जाते. परंतु नंतर तिला उत्सुकता वाटू लागते आणि ती ताबडतोब तिच्या सुनेला भेटायला आग्र्याहून दिल्लीला जाणारी ट्रेन पकडते. या काळात पंचम इलायचीला (हिबा नवाब) त्याच्या बायकोचं नाटक करण्यासाठी तयार करतो. बेबेसमोर इलायची आणि पंचम नवरा-बायको असल्याचं भासवतात, तर पिंटू घरातली मोलकरीण बनते. तरीही बेबेला पिंटूचं (हरवीर सिंग)चं तिथे असणं खटकतं आणि तिचं लग्न लावून टाकायचा निर्णय ती घेते. बेबे हार्ट पेशंट असल्याने तिला खरं सांगायला पंचम घाबरत असतो. आपला मुलगा आपल्याशी असंख्य वेळा खोटं बोलला आहे हे तिला कळलं तर तिला हार्ट अॅटॅक येईल, असं त्याला वाटत असतं.
बेबेला खरं कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल? इलायची ही वेळ निभावून नेईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेत मिळणार आहेत. पंचमची आईची भूमिका साकारण्याबद्दल उपासना सिंग सांगते, मला स्क्रीनवर नेहमीच पंजाबी पात्र साकारायला आवडतात. यामुळे जिजाजी छत पर है मालिकेत 'बेबे'चं पात्र रंगवतानाही मला खूप मजा आली. अगदी कमी काळात मी या कार्यक्रमाच्या टीममध्ये मिसळून गेले. जिजाजी छत पर है मालिकेचे आगामी भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडतील, अशी मला खात्री आहे.’’