'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये उर्मिला कानेटकरची धमाकेदार एण्ट्री, दिसणार या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:50 PM2023-04-12T13:50:14+5:302023-04-12T13:50:35+5:30
'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे.
स्टार प्रवाह(Star Pravah)वरील 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे. इतकी वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मल्हारला ही गोष्ट स्वराज सांगू इच्छित असला तरी नियतीच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी आहे. मल्हारला बाबा अशी हाक मारण्याचा क्षण आयुष्यात येण्यापूर्वीच स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावलाय. स्वराज त्याच्या मनातली भावना कशी व्यक्त करणार हे मालिकेतील पुढील भागांमधून उलगडेल.
स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरु असतानाच मालिकेत उर्मिला कानेटकरची एण्ट्री होणार आहे. उर्मिलाने मालिकेत स्वराच्या आईचं म्हणजेच वैदेही हे पात्र साकारलं होतं. मालिकेत वैदेहीचं गंभीर आजारामुळे निधन दाखवण्यात आलं असलं तरी स्वराच्या आठवणींमधून उर्मिलाचं दर्शन प्रेक्षकांना होत राहिलं. आता उर्मिला या मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंजुळा सातारकर असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तिच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे. याआधी उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पडद्यावर पाहिलं आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतला अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे.
या नव्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, ‘तुझेच मी गीत गात आहेच्या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होताना अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत मी वैदेही ही व्यक्तिरेखा साकारली होती. वैदेही या पात्राच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे जी साताऱ्याकडची आहे. या भाषेचाही वेगळा गोडवा आहे. याआधी अश्या पद्धतीचं पात्र मी साकारलेलं नाही. या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषांचा लहेजा मला आत्मसात करता येतोय. मंजुळा हे पात्र वैदेही सारखं दिसणारं आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल.