"स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाला...", उत्कर्ष शिंदेने आदर्शसाठी लिहिलेली 'ती' खास पोस्ट चर्चेत
By सुजित शिर्के | Updated: March 7, 2025 11:00 IST2025-03-07T10:56:51+5:302025-03-07T11:00:30+5:30
आदर्श शिंदेच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्षची पोस्ट; हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा.

"स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाला...", उत्कर्ष शिंदेने आदर्शसाठी लिहिलेली 'ती' खास पोस्ट चर्चेत
Utkarsh Shinde Post : मराठी कलाविश्वाला 'देवा तुझ्या गाभाऱ्याला', 'सुन्या सुन्या', 'अंबे कृपा करी' यांसारखी सुपरहिट गाणी देणारा प्रसिद्ध गायक म्हणजे आदर्श शिंदे (Adarsh Shinde). आदर्श शिंदे याने दमदार आवाजाने प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. मराठीबरोबर आदर्शने बरीच हिंदी गाणी सुद्धा गायली आहेत. त्याचबरोबर ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या कार्यक्रमाच्या बऱ्याच सीझनचे परीक्षण त्याने केलं आहे. त्याच्याप्रमाणे भाऊ उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) देखील गायन क्षेत्रात सक्रिय आहे. दरम्यान, आज ७ मार्च या दिवशी आदर्श शिंदेचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाऊ उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची सध्या बरीच चर्चा होताना दिसतेय.
उत्कर्ष शिंदे हा सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. आदर्शच्या वाढदिवशी उत्कर्षने सुंदर अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यासोबतच त्यानं एक व्हिडीओ देखील शेअर आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "माणसं जन्म घेतात आणि आयुष्यभर वर्तमानात स्वतःचं नाव करण्यात घालवतात. पण, काही जन्म घेतात पिढ्यान पिढ्यांचा उधार करायला, कुळाच नावं भविष्यावर कोरायला, समाजाची मान उंचावायला.आई वडिलांचा गुरूंचा महापुरुषांच्या अभिमान वाढवायला, आणि स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाला स्वप्न फक्त अतोनात मेहनतीने पूर्ण होतात ह्याची जाणीव करून द्यायला."
पुढे उत्कर्षने लिहिलंय, "तुझा आदर्श जगाने घ्यावा आणि तुझ्यासारखा भाऊ घरोघरी जन्म घ्यावा. तुझ्या वाढदिवस म्हणजे शिंदेशाही परिवाराचा सुरेल सोनेरी दिवस. तुला माझे आयुष्य ही लागो! लव्ह यू ब्रदर... कायम हसत राहा, मोठा हो...!" अशा शब्दांत आपल्या भावासाठी कौतुक करणारी पोस्ट उत्कर्षने लिहिली आहे. दरम्यान, उत्कर्षच्या ही पोस्ट पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. "महाराष्ट्राचा बुलंद आवाज..." तसंच "माझ्या समाजाचा मान ज्याच्या वर आहे सर्वांना अभिमान अश्या महागायकाला वाढदिवसाच्या खुप खुप मंगलमय शुभेच्छा..." अशा कमेंट नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.