वाढलेल्या वजनाचा झाला अभिनेत्रीच्या करिअरवर परिणाम; म्हणाली, 'मला माझ्या वयापेक्षा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:55 AM2024-04-26T10:55:58+5:302024-04-26T10:56:18+5:30
Tv actress: अलिकडेच या अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाढलेल्या वजनामुळे कशा प्रकारे संघर्ष करावा लागला हे सांगितलं.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वाहबीज दोराबजी (Vahbiz Dorabjee) सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. प्यार की ये एक कहानी या मालिकेच्या माध्यमातून ती नावारुपाला आला. या मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली. अलिकडेच वाहबीजने १० किलो वजन कमी केलं असून ती सध्या तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने नेमकं वजन का कमी केलं यामागचं कारण सांगितलं. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला कशा समस्यांना सामोरं जावं लागलं हे सांगितलं आहे.
अलिकडेच वाहबीज हिने 'बॉम्बे टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनविषयी भाष्य केलं. वाढलेल्या वजनाचा परिणाम तिच्या करिअरवर होऊ लागला होता. वजन वाढल्यामुळे तिला आईच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या होत्या, असं तिने यावेळी सांगितलं.
"मला ज्या पद्धतीच्या भूमिका ऑफर होत होत्या ते मला जराही पटत नव्हतं. मी कायम बॉडी पॉझिटिव्हीटीला सपोर्ट करते. पण, गेल्या काही काळात मला अशा काही भूमिका ऑफर झाल्या ज्या माझ्या वयापेक्षा जास्त होत्या. माझ्याच वयाच्या कलाकारांच्या आईची भूमिका मला ऑफर होत होती. त्यामुळे मी स्वत: वर काम करायला सुरुवात केली. आणि, आता माझ्यात झालेला बदल पाहून मी खूश आहे", असं वाहबीज म्हणाली.
पुढे ती म्हणते, "१० वर्षांपूर्वी मला थायरॉइड झाला होता ज्यामुळे माझं वजन वाढलं होतं. त्यानंतर मला डायबिटीजही झाला आणि माझ्या शारीरिक समस्या वाढल्या."
दरम्यान, वाहबीजने 'प्यार की ये एक कहानी', 'सावित्री', 'सरस्वतीचंद्र', 'बहू हमारी रजनीकांत' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. तसंच तिने २०२१ मध्ये Hiccups and Hookups या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.