वैशाली शर्मा सांगतायेत, ५० आणि ६० चा काळ अनेकांच्या मनात ठसलाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 09:19 AM2018-03-24T09:19:32+5:302018-03-24T14:54:06+5:30
सोनी मॅक्स २ टाईमलेस डिजिटल अॅवॉर्डच्या तिसऱ्या पर्वासह सज्ज आहे. या प्रकारचा उपक्रम सुरू करण्यामागे नेमका काय विचार होता? ...
सोनी मॅक्स हा हिंदी सिनेमाचा संपन्न वारसा साजरा करणारा एक मुख्य ब्रँड आहे. गेल्या अनेक दशकातील हिंदी सिनेमांची दखल कशी घ्यावी, या ब्रँडच्या मूळ विचारातूनच ही कल्पना साकारली आहे. हिंदी सिनेमाच्या प्रत्येक दशकात काहीतरी नवे आहे आणि हे सगळे एका कार्यक्रमात बसवणे शक्य नाही. वेगवेगळ्या दशकांतील हिंदी सिनेमा साजरा करण्याच्या कल्पनेतूनच टाईमलेस डिजिटल अवॉर्डची संकल्पना उदयास आली. पहिल्या पर्वात ८० आणि ९० चे दशक होते. गेल्या वर्षी आम्ही ७० च्या दशकातील अतुलनीय कामगिरी साजरी केली. वाहिनी म्हणून, प्रेक्षकांना सतत काहीतरी नवे, समकालिन पद्धतीने देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कुछ फिल्मों का जादू कभी कम नहीं होता, या आमच्या मूळ तत्वाला यात मुळीच धक्का लावला जात नाही.
तुम्ही ५० आणि ६० चे दशक का निवडलेत?
अनेक दशकांपासूनच्या कालातीत आणि सदाबहार सिनेमांचे माहेरघर म्हणजे सोनी मॅक्स२. ५० आणि ६० चा काळ हा अनेकांच्या मनात ठसला आहे. कारण, हा सिनेमाच्या पायाभरणीचा काळ समजला जातो आणि टाईमलेस डिजिटल अवॉर्डच्या माध्यमातून भारताचा हा कलात्मक वारसा पुन्हा जीवंत होईल, अशी आम्हाला आशा आहे. या काळात सिनेमातील अनेक पहिल्या गोष्टीही घडल्या. उदा. संगम हा परदेशात चित्रीत झालेला पहिला सिनेमा, गाइड हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये बनला आणि मुघल-ए-आझम हा त्या काळातील सर्वात महागडा सिनेमा. या संपन्न वारशाचे वारसदार म्हणून आम्हाला वाटते की या काळाला अपेक्षित महत्त्व मिळालेले नाही. शिवाय, या काळात कलाकारांना फारसे पुरस्कार, सन्मान वगैरे दिले जात नव्हते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात मोठ्या पडद्यावर आलेली ही महान प्रतिभा आपण जपायला हवी, त्या प्रतिभेला योग्य महत्त्व देऊन ती साजरी करायला हवी, हे खरेच.
तिसऱ्या पर्वाचा मूळ विचार काय आहे?
या वर्षीच्या टाईमलेस डिजिटल अवॉर्डची मूळ प्रेरणा आहे ५० आणि ६० चे दशक म्हणजेच भारत की शान. आपण हा काळच विसरून गेलोय. त्या आठवणी पुन्हा जागवणे, नव्या पिढीपर्यंत त्या नेणे यात आपल्याला अभिमान वाटेनासा झालाय. पण, येणाऱ्या पिढीला हिंदी सिनेमाचा संपन्न वारसा कळावा, त्यांनी त्याचा आदर करावा म्हणून आपण तो काळ जपायला हवा. टाईमलेस डिजिटल अवार्ड म्हणजे सोनी मॅक्स २ ने या दिशेने केलेला एक प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी डिजिटल माध्यम वापर करून आम्ही तरुण पिढीला यात अधिकाधिक सहभागी करून घेऊ.
या पर्वात कोणत्या विभागांसाठी नामांकने आहेत?
सदाबहार अॅक्टर, सदाबहार अॅक्ट्रेस या नेहमीच्या विभागांसोबतच काही नवे विभागही यंदा आहेत. आम्ही ज्या काळाबद्दल बोलतोय तिथे बेस्ट फिल्म या विभागाला आणखी उपविभाग द्यावे लागतील, जसे थ्रिलर, प्रेमकथा आणि सामाजिक परिणाम करणारे सिनेमे. म्हणूनच यावेळी आम्ही सदाबहार एपिक्स, सदाबहार थ्रिलर, सदाबहार प्रेमकहानियां असे विभाग केले आहेत. शिवाय, कलाकारांच्या अदि्वतीय प्रतिभेला वाखाणण्यासाठी आम्ही सदाबहार बालकलाकार, सदाबहार विनोदी कलाकार, सदाबहार स्टार असेही विभाग केले आहेत.
गेल्या दोन वर्षांत टाईमलेस डिजिटल अवॉर्डने कशी कामगिरी केली आहे आणि तिसऱ्या वर्षाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल अवॉर्ड्सनी दरवर्षी प्रचंड वाढ अनुभवली आहे. पहिल्या वर्षी ऐंशी हजार रसिकांनी मतदान केले होते. तर, दुसऱ्या वर्षी हा आकडा चार लाखांवर पोहोचला. यंदा आम्ही हे सगळे आकडे पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या वर्षी नवीन काय आहे?
या वर्षी ५० आणि ६० च्या दशकातील भव्यता लक्षात घेऊन अनेक नवीन विभाग यात आणले आहेत. पहिल्यांदाच, रसिकांना सर्व विभागांमध्ये त्यांचा आवडता स्टार निवडता येणार आहे. नव्या विभागांबरोबरच सदाबहार स्कोप आणि विभागवार स्पर्धांमधून प्रेक्षकांना सामावून घेणार आहोत. सदाबहार स्कोप हा एक सर्वसमावेशक उपक्रम आहे. यात रसिकांना त्या काळातील सिनेमांच्या आठवणी प्रत्यक्ष अनुभवता येतील.
आजची तरुण पिढी टाईमलेस डिजिटल अवॉर्डमध्ये रस घेईल, असे तुम्हाला का वाटते?
टाईमलेस डिजिटल अवॉर्ड हे जुना काळ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे सुयोग्य मिश्रण आहे. यातून सर्व भागांमधील, सर्व वयोगटातील हिंदी सिनेप्रेमींपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आम्ही प्रेक्षकांना आणि सतत फिरतीवर असणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या घरातच, आरामदायी वातावरणात सिनेमांच्या सुंदर आठवणी देऊ करणार आहोत. तरुणांना अधिक प्रमाणात आकर्षित करून घेण्यासाठी आम्ही #SadabaharLook च्या माध्यमातून फॅशन तज्ज्ञांकडून ५० आणि ६० च्या दशकातील लुक पुन्हा नव्याने तयार करणार आहोत. ही नव्या पिढीसाठी एक प्रेरणा ठरेल.