वंदना गुप्ते गठबंधन मध्ये दिसणार या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 08:00 PM2019-04-07T20:00:00+5:302019-04-07T20:00:02+5:30
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये वंदना गुप्ते यांची गणना केली जाते आणि आता त्या एका हिंदी मालिकेत झळकणार आहेत.
‘अभिनेत्री’, ‘चारचौघी’, ‘अखेरचा सवाल’, ‘ज्याचा त्याचा प्रश्ना’, ‘सुंदर मी होणार’ अशा अनेक प्रसिद्ध नाटकांमध्ये वंदना गुप्ते यांनी काम केले आहे. बकेट लिस्ट, पछाडलेला, मातीच्या चुली यांसारख्या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे आजवर कौतुक झाले आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जाते आणि आता त्या एका हिंदी मालिकेत झळकणार आहेत.
अभिनेत्री वंदना गुप्ते आता कलर्सच्या गठबंधन मध्ये दिसणार असून त्या सावित्रीच्या (सोनाली नाईक) मैत्रिणीची म्हणजेच निलिमाची भूमिका साकारणार आहेत. मालिकेतील त्यांच्या एंट्रीमुळे या मालिकेच्या कथानकाला चांगलीच कलाटणी मिळणार आहे आणि धनकच्या (श्रुती शर्मा) जीवनात चांगल्या घडामोडी घडणार आहेत. सध्याच्या सुरू असलेल्या ट्रॅक मध्ये संपूर्ण कुटुंबिय त्यांच्या सोसायटीत गुढी पाडव्याच्या पूजेचे आयोजन करणार आहेत... धनक लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सगळे प्रार्थना करणार आहेत आणि या सगळ्यात निलिमाची एंट्री होणार आहे.
निलिमा ही पटवर्धन नावाच्या राजकारण्याची पत्नी असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा सण साजरा करण्यासाठी वंदना सावित्रीकडे येणार आहे आणि ती सावित्री सोबत झिंगाट नृत्य देखील करणार आहे. मालिकेतील नाट्यमयता वाढविण्यासाठी निलिमा सावित्रीला धनकच्या विरोधात भडकवणार आहे आणि धनक आयपीएस ऑफिसर बनू नये यासाठी प्रयत्न करणार आहे.
गठबंधन या मालिकेत प्रवेश करण्याविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी वंदना गुप्ते सांगतात, “गठबंधन मधील गुढी पाडवा उत्सवात सहभागी होण्यात मला आनंद होत आहे. निलिमाच्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा आहेत आणि तिच्या प्रवेशाने धनकच्या जीवनात खूप आव्हाने निर्माण होणार आहेत. त्यामुळे मला निलिमाचे पात्र रंगविताना मजा येत आहे. आम्ही मराठी लोक गुढी पाडवा अतिशय उत्साहाने साजरा करतो. या मालिकेचे चित्रीकरण करण्याचा माझा अनुभव खूपच छान होता. यात मी सोनाली सोबत एक नृत्य देखील सादर केले. या मालिकेत जरी माझा सहभाग अगदी छोटा असला तरी मला आशा आहे की, प्रेक्षक या सिक्वेन्सचा आनंद घेतील.”