३३ वर्षानंतर वर्षा उसगांवकर पुन्हा थिरकणार लोकप्रिय गाण्यावर, पाहायला मिळणार तोच अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 05:58 PM2020-12-25T17:58:16+5:302020-12-25T18:00:15+5:30
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे एकत्र जमणार असून धमाल करणार आहेत. त्यामुळे वर्षा 'उधळीत ये रे...' या गाण्यावर डान्स सादर करणार आहेत.
मराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणा-या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीत 'गंमत- जंमत', 'हमाल दे धमाल', 'लपंडाव', 'भुताचा भाऊ' यासारखे मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या. इतकंच नाहीतर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या.'परवाने', 'तिरंगा', 'हस्ती', 'दूध का कर्ज', 'घर आया मेरा परदेसी' अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या. छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून वर्षा उसगांवकर रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे एकत्र जमणार असून धमाल करणार आहेत. त्यामुळे वर्षा 'उधळीत ये रे...' या गाण्यावर डान्स सादर करणार आहेत. जवळपास ३३ वर्षांनंतर 'गंमत जंमत' या सिनेमातील 'उधळीत ये रे गुलाल सजणा' परफॉर्म करण्याचा योग जुळून आलाय. इतक्या वर्षात मी कधीच या गाण्यावर परफॉर्म केलं नाही. मालिकेच्या विशेष भागाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या गाण्यावर थिरकायला मिळणार आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने हे गाणे कोरियोग्राफ केले आहे. त्यामुळे ३३ वर्षानंतर पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर यांचा तोच अंदाज पाहणे नक्कीच सुखद अनुभव असणार हे मात्र नक्की.
मालिका सुरू झाली तेव्हा दिलेल्या मुलाखतीत छोट्या पडद्यावर कमबॅक करत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा कोठारे व्हिजन्सची मालिका करताना आनंद होतोय. मालिकेमुळे आपण घराघरात पोहोचतो. प्रेक्षकांच्या जगण्याचा भाग होतो. त्यामुळेच मालिका करताना मला नेहमीच आनंद होतो.'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतली ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. नंदिनी गृहोद्योग समुहाची ती प्रमुख आहे. यासोबतच कोल्हापुरातल्या शिर्के पाटील या नामांकित कुटुंबाचं ती प्रतिनिधीत्व करते.