Video : काठा पदराची साडी, कपाळी चंद्रकोर...कपिल शर्मा शोमध्ये वर्षा उसगांवकरांचा पारंपारिक लुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 09:52 AM2023-05-18T09:52:33+5:302023-05-18T09:54:16+5:30
कपिल शर्मा शोमध्ये मंदाकिनी, संगिता बिजलानी आणि मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी हजेरी लावली
मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonker) आजही त्यांच्या सौंदर्याने आणि फिटनेसने सर्वांना घायाळ करतात. मराठीतील 'रुप की रानी' वर्षा उसगांवकर यांनी थेट कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma Show) हजेरी लावली आहे. यावेळी त्यांच्या पारंपारिक लुकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. कोणतेही वेस्टर्न आऊटफिट न घालता त्यांनी महाराष्ट्रीयन लुकला पसंती दिली आहे.
कपिल शर्माच्या नवीन एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या मध्ये 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनी, अभिनेत्री संगिता बिजलानी आणि मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी हजेरी लावली. कपिलने या तिघींचीही फिरकी घेत नेहमीप्रमाणेच धम्माल आणली. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वर्षा उसगांवकरांचा पारंपारिक लुक
कपिल शर्मासारख्या लोकप्रिय हिंदी शोमध्ये वर्षा उसगांवकर यांनी आपला मराठी बाणा जपला. आकाशी रंगाची काठापदराची साडी, गळ्यात हार, साजेसे दागिने, नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा त्यांचा पेहराव होता. भलेभले घायाळ होतील असा त्यांचा लुक होता. 55 व्या वर्षीही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि सौंदर्य कायम आहे. सेटवरील फोटो शेअर करत त्यांनी 'राघु मोर जोडीला...हात नका लावू माझ्या साडीला...! असं कॅप्शन दिलं आहे.
सध्या वर्षा उसगांवकर स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत भूमिका साकारत आहेत. १९९० मध्ये त्यांनी दूरदर्शनवर 'राणी लक्ष्मीबाई' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्य़े, सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केलं. वर्षा यांनी शिकारी, साथी, हनीमून, घर जमाई, तिरंगा, खलनायिका, इंसानियत के देवता, मुकदम,चेहरा यांसारख्या हिंदी सिनेमांत काम केलं.