वीणा जगताप पहिल्यांदाच साकारणार नकारात्मक भूमिका, म्हणाली - "माझ्या मनात पहिला विचार आला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 06:55 PM2024-09-24T18:55:39+5:302024-09-24T18:56:17+5:30

Sawalyanchi Janu Sawali Serial : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप ऐश्वर्या मेहेंदळेची भूमिका साकारणार आहे. ती पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे.

Veena Jagtap will play a negative role for the first time, said - "The first thought came to my mind..." | वीणा जगताप पहिल्यांदाच साकारणार नकारात्मक भूमिका, म्हणाली - "माझ्या मनात पहिला विचार आला..."

वीणा जगताप पहिल्यांदाच साकारणार नकारात्मक भूमिका, म्हणाली - "माझ्या मनात पहिला विचार आला..."

झी मराठी वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप ऐश्वर्या मेहेंदळेची भूमिका साकारणार आहे. ती पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेबद्दल वीणा जगताप म्हणाली की, "या मालिकेत मी ऐश्वर्या मेहेंदळेची भूमिका साकारत आहे. ती खूप महत्वाकांक्षी आहे, तिला तिच्या पुढे कोणी गेलेलं आवडत नाही."

वीणा जगताप यांनी सांगितले की, ऐश्वर्याचं लग्न अशा घरी झाले आहे जिथे तिच्या सासूबाईंना फक्त सुंदर गोष्टीच आवडतात. ऐश्वर्या मिस पुणे आहे आणि जेव्हा तिलोत्तमा पहिल्यांदा ऐश्वर्याला पाहते तेव्हा हीच सून हवी असं  ठरवते. ऐश्वर्या जरी हाऊसवाईफ असली तरीही ती स्वतः काही काम न करता लोकांकडून काम करून घेते. तिलोत्तमाची लाडकी सून आहे ऐश्वर्या. मला जेव्हा या मालिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला तेव्हा मी हिमाचल प्रदेश मध्ये फिरायला गेले होते. तिथे नेटवर्कही पुरेसं नव्हते. पण मला तो कॉल आला ‘सावळ्याची जणू सावली’ नावाचा एक शो आहे आणि एक भूमिकेसाठी तुझं ऑडिशन करायचे आहे, भूमिका नकारात्मक आहे तर तुला आवडेल का ऑडिशन द्यायला. माझ्या मनात पहिला विचार आला अरे बापरे! जमेल का आपल्याला, कारण सकारात्मक भूमिकेच्या तुलनेने नकारात्मक भूमिका थोड्या कठीण असतात असं मला वाटतं. 


तिने पुढे म्हटले की, माझ्याकडे एक स्क्रिप्ट आली ऑडिशनसाठी. साडी किंवा सलवार कमीज मध्ये ऑडिशन पाठवायची होती. मी फिरायला गेली होती तर फक्त ट्रॅव्हलचे कपडे नेले होते. मी ऑडिशन पाठवली, पण त्यांना ती  नाही आवडले. त्यांनी सांगितले पुढे काही असेल तर कळवू. मी ट्रिपवर होते तर मी तेवढं मनावर नाही घेतलं. सुट्टीवरून आली आणि मला परत कॉल आला की तू लूक टेस्टसाठी येऊ शकशील का, मी लूक टेस्ट दिली आणि त्याच दिवशी माझी उज्जैनची ट्रेन होती. मी महाकालला जात होते. दुसऱ्या दिवशी मी देव दर्शनासाठी गेली माझं दर्शन झाले आणि मी मंदिरातून बाहेरच पडत होते आणि तेव्हाच मला कॉल आला की तुझी निवड झाली आहे. मला प्रचंड आनंद झाला आणि दडपणही तेवढच आले. माझी आई होती सोबत ती म्हणाली तुला प्रसाद मिळाला . जेव्हा पहिल्यांदा प्रोमो आला आणि मला मिक्स प्रतिसाद मिळाला नकारात्मक भूमिका का करतेय म्हणून. पण माझं असं आहे की प्रायोगिक असलं पाहिजे आणि मला ही बघायचे आहे की मी अश्या भूमिकेला न्याय देऊ शकेन का. माझं असं ही मत आहे की मी अजून तितकी मोठी अभिनेत्री झाली नाहीये. म्हणजे पॉप्युलर होणं आणि मोठी अभिनेत्री होणं दोन वेगळ्यागोष्टी आहेत. मी पॉप्युलर असू शकते पण ग्रेट अभिनेत्री नाही आणि त्यासाठी मला अशा आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायची संधी मिळत असेल तर मला त्या करायच्या आहेत. आता आव्हान घेतले आहे आणि मेहनत करायची तयारी आहे. बघूया प्रेक्षक कशी साथ देतील. 

Web Title: Veena Jagtap will play a negative role for the first time, said - "The first thought came to my mind..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.