सारांश: जेवणाचे नाटक आणि स्वागताचा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 10:04 AM2022-05-15T10:04:06+5:302022-05-15T10:04:46+5:30
बेळगावात प्रयोग करणं मराठी नाटकाला परवडत नाही. बरेच कर वगैरे भरावे लागतात.
संजय मोने, अभिनेता
बेळगावात प्रयोग करणं मराठी नाटकाला परवडत नाही. बरेच कर वगैरे भरावे लागतात. पण गोवा किंवा कोल्हापुरात येऊन नाटकाचं नेपथ्य कर्नाटकातील वाहनात भरून आणि कलाकार इतर मार्गाने येऊन प्रयोग केले जातात. जरा त्रास होतो पण बेळगावमध्ये प्रयोग असला की पार हुबळी-धारवाड-चंदगडपासून प्रेक्षक येतात. फार मराठी नाटकं वारंवार बघायला मिळत नसल्याने एखादा प्रयोग लागला की आसुसल्यासारखे येतात.
अत्यंत प्रेमळ आणि रसिकोत्तम. भरभरून दाद देणार, अगदी टाळ्या, शिट्ट्या सगळ्याची भरमार. शिवाय प्रयोग संपल्यावर आम्ही थोडा वेळ घेऊन (या थोड्या वेळेचा हिशेब कधीच लावता येत नाही.) जेवायला गेलो तरीही अत्यंत अदबशीरपणे चौकशी करणार. एखादा कोणीतरी ओळखीचा असेल तर मग बघायलाच नको. साधारण आत्तापर्यंत मी बेळगावला आठ-दहा वेळा गेलो आहे. तिथे आमचे अहमद खोजा साहेब आहेत. शिवाजी हंडे साहेब आहेत. जीवाला जीव देणारी माणसं.
पण आता मी जो प्रसंग सांगतोय त्यावेळी हे सगळे हजर नव्हते. कारण कोणीतरी जांगडे किंवा जंगले नावाच्या कंत्राटदाराने आमचा ‘हम तो तेरे आशिक हैं’ नाटकाचा प्रयोग कोणासाठी तरी ठरवला होता. तिकीट विक्री वगैरे नव्हती. प्रयोग फुल्ल होता. प्रत्यक्षात जेमतेम चारशे लोक होते. एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी नाटक ठेवलं होतं. प्रयोग सुरू झाल्यावर दर पंधरा मिनिटांनी थांबवून काही लोकांना रंगमंचावर हारतुरे दिले जात होते. त्यांनी केलेल्या अहेराच्या रकमा घोषित करून टाळ्यांचा गजर होत होता. साधारण अडीच तास झाले, म्हणजे आमच्या नाटकाचा एक अंक संपायला पाच दहा मिनिटं उरली होती (आमच्या नाटकाचा अंक एकतास दहा मिनिटं इतकाच होता) तेवढ्यात कंत्राटदार आला आणि म्हणाला, ‘दहा मिनिटांत संपवा नाटक. कारण वधू-वराची मिरवणूक आहे.’ मीही चिडलो होतो म्हणालो, ‘हे घ्या संपवले नाटक.’ शेवटचे संगीत वाजवून पडदा टाकला. निर्माता पैसे घेऊन मोकळा.
आम्ही थांबलेले. जेवणासाठी. अचानक एक माणूस आम्हाला कोपऱ्यात घेऊन गेला. तीन-चार भांडी त्यात अन्न. ताट नाहीत, वाट्या नाहीत, पाणी नाही. चमचे वगैरे तर दूरचीच बाब. दोन-तीन माणसांना पुरेल इतका भात. कोणालाही पुरणार नाही अशी आमटी. बाकी ५० एमएल ताक. चिडून चौकशी केली तर, ‘तुम्ही जेवायला थांबणार नाही असं सांगितलं होतं, आम्ही दयाळू म्हणून ही सोय केली’, असे उत्तर मिळाले.
शेवटी आमच्या अहमद खोजा साहेबांना फोन लावला, त्यांनी एका ठिकाणी पिठलं, भात, भाकरी, दही, ताक आणि कोशिंबीर अशी सोय केली. त्या अन्नाची चव आजही रेंगाळते आहे. धन्यवाद खोजा साहेब!