Vikram Gokhale: भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण? संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 08:24 AM2022-02-03T08:24:56+5:302022-02-03T08:25:27+5:30
Vikram Gokhale: प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद करावे, या सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका सुरू असताना नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद करावे, या सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका सुरू असताना नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. गोखले हे स्वत: कलाकार असून, त्यांनी स्वत: टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांना या माध्यमाची चांगली माहिती असताना त्यांनी केलेली टीका ही अनाकलनीय तर आहेच पण प्रेक्षकांच्या अभिरुचीवर एक कलाकार म्हणून त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करणे हेही अप्रस्तुत असल्याचे मत संबंधितांनी व्यक्त केले.
वाहिनीचे हेड हेडलेस
भिकार मालिका पाहाव्या की नाही, हा प्रेक्षकांचा चॉईस आहे. गोखलेंना भिकार वाटणाऱ्या मालिका प्रेक्षकांना चांगल्या वाटू शकतात. जे आवडते तेच वाहिन्या दाखवतात. त्यातून वाहिनीला जाहिराती मिळतात. गोखले यांनी माझ्या मालिकेत १५० भागांमध्ये काम केले होते. पण प्रेक्षकांनी मालिका पाहू नये, असे मी म्हणणार नाही. निर्मितीमध्ये दर्जा राहिलेला नाही कारण वाहिनीचे हेड हे हेडलेस आहेत.
- अशोक समेळ, ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक
प्रेक्षकांचा आदर करा
गोखले यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. कारण चांगले आणि वाईट या संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहेत. टीआरपी ही संकल्पना किती खरी, किती खोटी याबद्दल कितीही वाद प्रवाद असले तरी त्यावर टेलिव्हिजन चालतो हे अंतिम सत्य आहे. कलाकार म्हणून गोखले यांनी प्रेक्षकांच्या अभिरुचीचा आदर केला पाहिजे. मला त्यांचे विधान अजिबात मान्य नाही.
- शिरीष लाटकर, लेखक
कलाकारांच्या पोटावर पाय
सगळ्यांना भिकार म्हणणे चुकीचे ठरेल. ही मोठी इंडस्ट्री आहे. लेखक, तंत्रज्ञ, कामगार अशांना कामे मिळाली आहेत. प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन करण्याचे काम मालिका करत आहेत. काही मालिका वाईट असतीलही परंतु ते आपण प्रेक्षकांवर सोडले पाहिजे. प्रेक्षकांनी मालिका पाहणे बंद केले तर अनेक लेखक, कलाकारांच्या पोटावर पाय येईल. गोखले यांनी ‘एक धागा सुखाचा’मध्ये काम केले आहे. ज्यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो, त्या मालिका चालू राहतात.
- नितीन वैद्य, निर्माते
नाउमेद करणारे बोलू नका
विक्रम गोखले यांना जर कोणत्या मालिका भिकार वाटत असतील तर त्यांनी त्या पाहू नयेत. त्यांच्यावर न आवडणाऱ्या मालिका पाहण्याची सक्ती कुणीच करणार नाही. कोणत्या मालिका पाहाव्यात, त्या निवडण्याइतके प्रेक्षक सूज्ञ आहेत. खुद्द गोखले यांनीही दीर्घ कारकीर्द केली आहे. मालिकात काम केले आहे. त्यांनी केलेली टीका नवीन लेखक, कलाकार, दिग्दर्शक यांना नाउमेद करणारी आहे, हे खेदाने नमूद करावे लागते.
- विजू माने, दिग्दर्शक
नाटकंही वाईट असतात
प्रेक्षकांनी काय पाहावे हे आपण ठरवू शकत नाही. भिकार हा शब्द वापरण्याइतके मालिकेत वाईट काम सुरू नाही. खूप लोकांचे त्यात कष्ट आहेत, अनेकांचे उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. अनेकांचे त्यातून करिअर घडत आहे. काही मालिका काहीअंशी वाईट आहेत, पण भिकार या शब्दाला माझा विरोध आहे. काही सिनेमा, नाटकंदेखील वाईट असतात.
- मंगेश कंठाळे, दिग्दर्शक
फरक पडतो का?
गोखले यांनी स्वत: मालिकांत काम केले आहे. प्रत्येक मालिका ही मनापासून केली जाते. प्रेक्षकांना चांंगले आणि वाईट याची जाण नक्की आहे. ज्या मालिका चांगल्या नाहीत त्यांना टीआरपी नसतो, ते प्रेक्षकांवरच सोडून द्यावे. कोणाच्या बोलण्याने त्याच्यात फरक पडत नाही.
- रवी करमकर, दिग्दर्शक