या मालिकेद्वारे विक्रम गोखले करणार हिंदी मालिकेत पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 08:00 PM2019-02-24T20:00:00+5:302019-02-24T20:00:02+5:30
विक्रम गोखले हे कोणत्या आगामी चित्रपट, मालिका अथवा नाटकात दिसणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठी रंगभूमीवरील त्यांच्या सगळ्याच नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. विक्रम गोखले हे कोणत्या आगामी चित्रपट, मालिका अथवा नाटकात दिसणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ते लवकरच एका मालिकेत दिसणार असून या मालिकेसाठी त्यांनी चित्रीकरण करायला देखील सुरुवात केली आहे.
मराठी नाट्य आणि सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर कायमच प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. त्यांनी बॉलीवूडमध्येही आपले प्रस्थ निर्माण केले असून आता स्टार प्लसवरील ‘दिव्य दृष्टी’ या आगामी मालिकेद्वारे ते हिंदी मालिकेत पुनरागमन करणार आहेत.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात नंदिनीच्या म्हणजेच ऐश्वर्या रायच्या वडिलांच्या भूमिकेत विक्रम गोखले झळकले होते. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. या चित्रपटाप्रमाणेच ‘भूलभुलैय्या’मधील त्यांनी साकारलेली गुरूजीची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली होती. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा ताकदीने साकारल्या असून त्यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. याचमुळे दिव्य दृष्टीमधील साधूच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना ते अगदी सुयोग्य वाटले आणि त्यांना या भूमिकेसाठी विचारण्यात आले.
दिव्य दृष्टी या मालिकेची कथा खूपच वेगळी आहे. या मालिकेत सुपर पॉवर्स असलेल्या दोन बहिणींचे आयुष्य दाखवण्यात येणार आहे. या दोन बहिणींमधील एकीला म्हणजेच दृष्टीला भविष्य दिसते तर दिव्यकडे ते बदलण्याची असाधारण क्षमता आहे. अशा सुपर पॉवर्सना धोका हा असतोच. त्यामुळे या बहिणींना दुष्ट पिशाचिणीपासून सावध राहणे गरजेचे असते. त्या या सगळ्यांचा सामना कशा करतात हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.
या खास संकल्पना असलेल्या मालिकेला आपल्या अभिनयाने विक्रम गोखले एका वेगळ्या उंचीवर नेतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही मालिका नुकतीच स्टार प्लसवर सुरू झाली आहे.