'इंडियाज बेस्ट डान्सर ३'मध्ये विपुल खांडपाल आणि समर्पण लामाची 'चंद्रयान ३'ला सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 02:25 PM2023-09-02T14:25:05+5:302023-09-02T14:25:22+5:30
Indias Best Dancer 3 : इंडियाज बेस्ट डान्सर ३मध्ये या वीकेंडला ‘डान्सचा ट्रिपल धमाल’ असणार आहे. या धमाल भागात दोन स्पर्धक आणि एक कोरिओग्राफर मिळून प्रतिभेचे अद्भुत फ्यूजन सादर करतील आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर ३(India's Best Dancer 3)मध्ये या वीकेंडला ‘डान्सचा ट्रिपल धमाल’ असणार आहे. या धमाल भागात दोन स्पर्धक आणि एक कोरिओग्राफर मिळून प्रतिभेचे अद्भुत फ्यूजन सादर करतील आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. हा एपिसोड म्हणजे टॉप ८ मध्ये जागा पटकावण्याची स्पर्धकांची शेवटची संधी असेल. यासाठी त्यांना आपल्या परफॉर्मन्समधून परीक्षक गीता कपूर आणि टेरेन्स लुईसला प्रभावित करावे लागेल. या विशेष भागात बॉलीवूडची सुंदर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मौशमी चटर्जी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
विपुल खंडपाल आणि समर्पण लामा यांनी कोरिओग्राफर पंकज थापासोबतच्या परफॉर्मन्समधून ISRO ला आणि चंद्रयान ३ मोहिमेला हार्दिक आदरांजली वाहिली तो क्षण या एपिसोडमधला हायलाइट होता. या परफॉर्मन्समध्ये त्यांनी वैज्ञानिकांचा संघर्ष आणि आपल्या कामातील अढळ निष्ठा दाखवून त्यांच्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पाहिला देश कसा बनला ही दाखवले. ‘८३’ चित्रपटातील ‘लहरा दो’ आणि ‘ब्रदर्स’ चित्रपटातील ‘सपना जहां’ या गाण्यांवर त्यांनी सादर केलेल्या अॅक्टने परीक्षकांना भावुक करून सोडले.
परीक्षक टेरेन्स लुईस आपल्या भावना आवरू शकला नाही. तिन्ही कलाकारांचे कौतुक करताना तो म्हणाला, “अप्रतिम अॅक्ट! हा अप्रतिम अॅक्ट कोरिओग्राफ करणारे तुम्ही तिघेही धन्य आहात. पंकज, विपुल, समर्पण तुम्ही आज आपल्या डान्समधून आम्हाला तो गर्वाचा अनुभव दिलात. तुमच्या परफॉर्मन्स मध्ये कमालीची भावनिक खोली होती. तुमच्या डान्सिंगचा दर्जा, पॅशन आणि विविध रचनांमधून तुम्ही वैज्ञानिकांची मनोवृत्ती ज्या रीतीने सादर केलीत, त्याला सलाम! हा अॅक्ट केवळ अप्रतिम नव्हता तर इतिहास घडवणारा होता.”
पुढे तो म्हणाला, २३ ऑगस्ट रोजी, जेव्हा चंद्रयान ३ लँड होणार होते, आणि आपण ते लॅंडींग पाहिले, शास्त्रज्ञांचा आनंद पाहिला तेव्हा मी भावुक झालो होतो. कठोर परिश्रमानंतर विजय कसा मिळवायचा, ही भावना फक्त भारतीयच खऱ्या अर्थाने अनुभवू शकतात. चिकाटीच्या मदतीने आव्हानावर मात करण्याचा अभिमान या मोहिमेतून आपण अनुभवला.
तर मौशमी चटर्जी म्हणाल्या की, चंद्रयान मोहिमेतून आपण हाच धडा शिकलो की आशा कधी सोडू नये. यान लँड होताना मनावर कसा ताण होता, हे मला आठवते आहे. मी माझ्या घरकामाच्या बाईला देखील बजावून ठेवले होते की चंद्रयान लँड होईपर्यंत मध्येच व्यत्यय आणू नकोस. ती भावना व्यक्त करायला माझ्यापाशी शब्दच नाहीत. भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो!