"त्या स्पर्धकाने रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवायला हवी होती", 'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणावर विशाखाची खरमरीत पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:44 IST2025-02-24T16:43:23+5:302025-02-24T16:44:40+5:30
विशाखाने फेसबुकवरुन रणवीर अलाहाबादिया आणि 'इंडियाज गॉट लॅटेंट'बाबत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने रणवीरला खडे बोल सुनावले आहेत.

"त्या स्पर्धकाने रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवायला हवी होती", 'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणावर विशाखाची खरमरीत पोस्ट
रणवीर अलाहाबादियाने 'इंडियाज गॉट लॅटेंट'मध्ये आईवडिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी समय रैना आणि रणवीर अलाहाबादियावर FIR दाखल करण्यात आली होती. यामुळे रणवीरला ट्रोलही करण्यात आलं होतं. अनेक सेलिब्रिटींनी याबाबत पोस्ट शेअर करत मत मांडलं होतं. आता विशाखा सुभेदारने यावर खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.
विशाखाने फेसबुकवरुन रणवीर अलाहाबादिया आणि 'इंडियाज गॉट लॅटेंट'बाबत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने रणवीरला खडे बोल सुनावले आहेत.
विशाखा सुभेदारची पोस्ट
वि(वेक)नोद संपला.
माणसं दारू पितात. ती प्रमाणात पितात तोपर्यंत ठीक. पण एखादा प्रमाणाबाहेर प्यायला लागला तर आपण काय म्हणतो? तो दारूवर नाही, तर दारू त्याच्यावर स्वार झालीय. आजच्या सो कॉल्ड तरूण वर्गाचंही काहीसं असंच झालंय. सोशल मीडियाच्या तो एवढा आहारी गेला आहे की सोशल मीडिया त्याच्यावर पूर्णतः हावी झालाय. त्यामुळे झालंय असं की त्याने आपला विवेक गहाण ठेवलाय, हेही त्याला कळत नाही. सद्सदविवेकबुध्दी नावाची काही गोष्ट असते, हे तो पूर्ण विसरून गेला आहे. झटपट प्रसिध्दीसाठी सोशल मीडियाचा कसाही वापर व्हायला लागलाय. त्यातही विनोदाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खपवलं जातं. त्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल न बोललेलं बरं.
अगदी ताजं उदाहरण म्हणजे युट्यूबवरचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा कार्यक्रम. विनोद निर्मितीसाठी जर एखादी नीचतम पातळी असेल, तर रणवीर अलाहाबादीया त्याच्याही पुढे गेला. समोरच्या स्पर्धकाला त्याच्या आई वडिलांच्या सेक्स संदर्भात प्रश्न विचारून विनोद करणं, हे विकृत असल्याचंच लक्षण आहे. खरं तर त्या स्पर्धकाने बाणेदारपणा दाखवून रणवीर अलाहाबादीयाच्या कानाखाली वाजवली पाहिजे होती. त्या रणवीर अलाहाबादीयापेक्षा लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं असतं.
महाराष्ट्रात दादा कोंडके, राम नगरकर, राजा गोसावी यांच्यासारखे अनेक विनोदवीर होऊन गेले. दादा कोंडके यांच्या व्दयर्थी संवादांना आणि गाण्यांना लोकांनी भरभरून दाद दिली. पण त्यांना कधी कचाट्यात पकडता आलं नाही. याला म्हणतात टॅलेंट. चि.वि.जोशी, आचार्य अत्रे, शंकर पाटील, द.मा.मिरासदार, पु.ल.देशपांडे अशा अनेक विनोदी लेखकांनी विनोदासाठी कधीच कमरेखालचा वापर केला नाही.
परकीय कार्यक्रमांचं अनुकरण करताना थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं. रणवीर अलाहाबादीयालाही आईवडील असतील. बहीण असेल. याचा विचार त्याने प्रश्न विचारताना करायला हवा होता. पण काही जणांना येनकेन प्रकारे पैसा आणि प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाण्याचा रोगच जडला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट'सारख्या कार्यक्रमावर उड्या मारणाऱ्या प्रेक्षकांनीही आपली अभिरुची तपासून बघण्याची गरज आहे. आता स्टॅण्डअप कॉमेडी करणारे किंवा इतरही कलाकार यापुढे जबाबदारीने विनोद निर्मिती करतील अशी अपेक्षा. यापुढे तरी थोडं भान ठेवायला हवं.
विशाखाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशाखाने पोस्टमधून प्रसिद्धीसाठी अश्लील विनोद करणाऱ्यांना चपराक लगावली आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.