'हो..आहे वजनदार, पण मलाही एन्जॉय करु द्या की', ट्रोल करणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 19:16 IST2023-09-15T19:14:55+5:302023-09-15T19:16:55+5:30
विशाखाने एक डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती 'मला प्रितीच्या झुल्यात झुलवा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

vishakha subhedar
विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायमच चर्चा रंगत असते. अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामुळे ती चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
विशाखाने एक डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती 'मला प्रितीच्या झुल्यात झुलवा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलंय. तिने लिहलं की, मी लाडाची....! आत्ता धरती मातेच काय होईल? भूकंप होईल ह्या सगळ्या कंमेंट ठेवा... तुमच्यापाशी..!हो..आहे वजनदार पण मला पण enjoy करु द्या कीं तुमचं रंजन करत आलेच आहे कीं मी.. मज्जेत राहू द्या आणि तुम्ही पण मज्जेत रहा". विशेष म्हणजे यावेळी विशाखाची एनर्जी लेव्हल पाहून काही नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
यापुर्वीही एका मुलाखतीमध्ये विशाखाने वजनावरुन वा शरीरयष्टीवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं. तसंच तिने सौंदर्याचे चुकीचे मापदंड याविषयावर मत मांडली होती. विशाखाला नृत्याची विशेष आवड असून ती कायम तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. विशाखा मराठीतील गुणी अभिनेत्री आहे. ‘फक्त लढ म्हणा’ , ‘४ इडियट्स,‘अरे आवाज कोनाचा’ ,‘ये रे ये रे पैसा’आणि ६६ सदाशिव या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. सध्या विशाखा ही ‘शुभविवाह’ या मालिकेत रागिणी हे पात्र साकारताना दिसत आहे.
विशाखा सुभेदारचं मराठी कलाविश्वात एक दबदबा निर्माण झाला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री म्हणजे बारीक, सुंदर ही जी व्याख्या आहे ती तिने खोडून काढली आहे. अभिनेत्री असण्यासाठी रंगरुप गरजेचं नाही. तर, त्यासाठी अंगी कला असणं गरजेचं आहे हे तिने दाखवून दिलं आहे.