पंढरपूरमध्ये अवतरली 'विठूमाऊली'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:18 AM2017-10-25T10:18:33+5:302017-10-25T15:48:33+5:30

मराठी टेलिव्हिजनवर येत असलेल्या 'विठूमाऊली' या मालिकेविषयी अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विठ्ठलाच्या अगाध महिम्याला साजेशा भव्यदिव्य ...

Vithu Mauli in Avtarli in Pandharpur | पंढरपूरमध्ये अवतरली 'विठूमाऊली'

पंढरपूरमध्ये अवतरली 'विठूमाऊली'

googlenewsNext
>मराठी टेलिव्हिजनवर येत असलेल्या 'विठूमाऊली' या मालिकेविषयी अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विठ्ठलाच्या अगाध महिम्याला साजेशा भव्यदिव्य सोहळ्यात आणि भारावलेल्या वातावरणात थेट पंढरपूरमध्ये 'विठूमाऊली' अवतरली. स्टार प्रवाहवर 'विठूमाऊली' ही मालिका ३० ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 
या सोहळ्यापूर्वी निर्माते महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी पंढरपूरच्या मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतले. त्यानंतर मुख्य सोहळ्याचा प्रारंभ झाला. सुरुवातीला ह.भ.प. पुरुषोत्तमबुवा पाटील यांचे सुश्राव्य किर्तन झाले. भावभक्तीने ओथंबलेल्या या किर्तनात उपस्थित प्रेक्षक दंग झाले होते. अध्यात्म आणि वास्तव जगाची सांगड घालणाऱ्या या किर्तनाला विठूमाऊलीच्या गजराने भरभरून प्रतिसादही मिळाला. इतक्यातच प्रेक्षकांना सुखद धक्का देत ‘विठूमाऊली’ रंगमंचावर अवतरली. उपस्थितांनी विठूमाऊलीचे ते देखणं रूप डोळ्यात साठवून घेताच विठूमाऊली अंतर्धानही पावली. मात्र विठूदर्शनाने वातावरण भारावून गेले होते. 
आजवर स्टार प्रवाहने कायमच आशयसंपन्न मालिका सादर केल्या आहेत. ‘विठूमाऊली’ या मालिकेच्या रूपाने स्टार प्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकत आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातले नातेही ही मालिका उलगडणार आहे. विठूमाऊली या मालिकेच्या रूपाने एक भव्यदिव्य कथानक प्रेक्षकांसमोर येणार आहे. विठ्ठलाचा महिमा जितका भव्य आहे, तशीच ही मालिकाही भव्यदिव्य असणार आहे. या मालिकेसाठी खास कॉस्च्युम आणि ज्वेलरी डिझायनिंग करण्यात आले आहे. उच्च दर्जाच्या कॉम्प्युटर ग्राफिक्सची जोडही या मालिकेला मिळाली असल्याने कथानकातली भव्यता प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली आहे. स्टार प्रवाहने आतापर्यंत आपल्या मालिकांतून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विठूमाऊली या मालिकेतही आपल्याला अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत विठ्ठलाच्या भूमिकेत अजिंक्य राऊत, रुक्मिणीच्या भूमिकेत एकता लबडे, सत्यभामाच्या भूमिकेत बागेश्री निंबाळकर आणि राधाच्या भूमिकेत पूजा कातुर्डे हे कलाकार दिसणार आहेत. त्याशिवाय इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये अनुभवी कलाकारही आहेत. मालिकेची पटकथा संतोष अयाचित आणि पराग कुलकर्णी यांची आहे तर या मालिकेचे संवाद लेखन अजिंक्य ठाकूर करत आहेत. या कथानकाची भव्यता रुपेश पाटील चित्रित करत आहेत तर अविनाश वाघमारे मालिकेचे दिग्दर्शक आहेत. मालिका सुरू होण्यापूर्वीच याच्या शीर्षक गीताविषयी मोठी चर्चा आहे. आपल्या पहाडी आवाजात आदर्श शिंदे यांनी हे शीर्षक गीत गायले आहे. गुलराज सिंग यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. गुलराज यांनी यापूर्वी ए. आर. रेहमान, शंकर-एहसान-लॉय अशा अनेक दिग्गजांसह संगीत निर्मिती केली आहे. अक्षयराजे शिंदे यांनी हे गीत लिहिले आहे. या मालिकेविषयी निर्माते महेश कोठारे सांगतात, 'विठ्ठल हे महाराष्ट्राचे दैवत आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील माणूस विठ्ठलाचा भक्त आहे. त्यात गरीब-श्रीमंत असा भेद नाही. प्रत्येकाच्या विठ्ठलाशी भावना जोडलेल्या आहे. मात्र, अनेकांना विठ्ठलाची गोष्ट माहीत नाही. ती मालिकेतून आम्ही दाखवणार आहोत. महाराष्ट्राचे लाडके दैवत असूनही तितक्या भव्यतेने विठ्ठल महाराष्ट्रापुढे कुणीच मांडलेला नाही. या मालिकेतून विठ्ठलाची कथा त्याचे पौराणिक संदर्भ जपून रंजक पद्धतीने आणि तितक्याच भव्यतेने सादर केली जाणार आहे. आमच्या टीमने त्यासाठी पंढरपूरला जाऊन अभ्यास केला आहे. अनेक पोथ्या-पुराणांतून संदर्भ घेतले आहेत. विठ्ठल मंदिराचे विश्वस्त, जाणकार-तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आहे. या मालिकेतून या दैवताविषयी असलेल्या भावनांना अधिक उंचीवर घेऊन जायचे आहे. त्यासाठी सगळा अभ्यास केला आहे. ही मालिका प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील, विठूमाऊलीसमोर नतमस्तक होतील याची मला खात्री आहे.'

Also Read : उर्मिलाला आता मी जितका वेळ देईल, तितका तो कमीचः आदिनाथ कोठारे
 

Web Title: Vithu Mauli in Avtarli in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.