विठुमाऊलीने असा दिला अजिंक्य राऊतला आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 08:40 PM2018-12-10T20:40:00+5:302018-12-10T20:40:00+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत विठ्ठलाची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत साकारतो आहे आणि त्याच्या या भूमिकेची सगळीकडून प्रशंसा होत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत विठ्ठलाची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत साकारतो आहे आणि त्याच्या या भूमिकेची सगळीकडून प्रशंसा होत आहे. योगायोग म्हणजे अजिंक्यचा जन्म एकादशीचा असून तो म्हणतो हा विठ्ठलाचाच आशीर्वाद आहे.
‘विठुमाऊली’ या मालिकेत विठ्ठल विरुद्ध कली असे महायुद्ध सुरु झाले आहे. या युद्धात विजय मिळावा यासाठी रुक्मिणी देवींनी विठ्ठलाच्या दंडावर तुळशीपत्र बांधले आहे. कलीचा नाश करण्याच्या हेतूनेच विठ्ठलाने हे सुवर्ण तुळशीपत्र दंडावर धारण केले आहे. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे विठ्ठलाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतच्या दंडावरही तुळशीपत्राच्या आकाराची खूण आहे. योगायोग असा की, अजिंक्यचा जन्मही एकादशीचा आहे. या सर्व गोष्टी अजिंक्यसाठी खूप अद्भूत आहेत. विठ्ठलाचाच आशीर्वाद असल्याचे तो सांगतो. विठुमाऊली हे माझे लाडके दैवत आहे आणि मालिकेच्या निमित्ताने विठ्ठलाचे रुप साकारण्याची संधी मिळाली ही आनंददायी गोष्ट असल्याची भावना अजिंक्यने व्यक्त केली.
‘विठुमाऊली’ या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला गेल्या एक वर्षापासून मिळत आहे. संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. या आधी ही या आधी ही कोठारे व्हिजनने जय मल्हार, मन उधाण वाऱ्याचे, गणपती बाप्पा मोरया अशा अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत.
विठुमाऊली मालिकेच्या यापुढील भागांमध्येही विठ्ठलाच्या वेगवेगळ्या रुपांचे दर्शन होणार आहे. त्यासाठी ‘विठुमाऊली’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला विसरू नका.