Bigg Boss Contestants : बिग बॉसच्या घरात राहायला स्पर्धकांना मिळतात इतके पैसे, आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 06:17 PM2019-09-24T18:17:59+5:302019-09-24T18:19:10+5:30
Bigg Boss Contestant's Fees : बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी स्पर्धकांना चांगलेच पैसे दिले जातात. कधी कधी तर कार्यक्रमाच्या विजेत्यापेक्षा घरात असलेला प्रसिद्ध सेलिब्रेटी जास्त पैसे कमावतो.
बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. आता या कार्यक्रमाचा 13 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या या सिझनचे सूत्रसंचालन देखील बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करणार आहे. या सिझनची घोषणा झाल्यापासून या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी स्पर्धकांना किती पैसे मिळतात हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल आणि विशेष म्हणजे कधी कधी तर कार्यक्रमाच्या विजेत्यापेक्षा घरात असलेला प्रसिद्ध सेलिब्रेटी जास्त पैसे कमावतो. न्यूजट्रेंडने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. तिला घरात राहाण्यासाठी प्रत्येक आठवड्याला सहा लाख रुपये मिळत होते तर तिच्या तुलनेत हिना खानला जास्त पैसे मिळत होते. त्यामुळे बिग बॉसची विजेतेपद मिळाल्यानंतर शिल्पाला 1.27 करोड रुपये मिळाले होते तर हिनाने 1.29 करोड रुपये कमावले होते.
बिग बॉसच्या एका सिझनमध्ये आपल्याला रिमी सेनला पाहायला मिळाले होते. तिला या घरात येण्यासाठी तब्बल दोन करोड रुपये मिळाले होते. कोणत्याही स्पर्धकाला मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच जास्त होती तर श्वेता तिवारी ज्या सिझनची विजेती ठरली त्या सिझनमध्ये आपल्याला इंटरनॅशनल खिलाडी खलीला पाहायला मिळाले होते. खलीने या घरात राहाण्यासाठी दर आठवड्याला 50 लाख रुपये घेतले होते.
करिश्मा तन्नाला या घरात राहाण्यासाठी दर आठवड्याला दहा लाख रुपये मिळाले होते. या कार्यक्रमाचे विजेतेपद तिला मिळाले नसले तरी या कार्यक्रमाचा विजेता गौतम गुलाटीपेक्षा तिने जास्त पैसे कमावले होते तर काजोलची बहीण तनिषाला देखील दर आठवड्यासाठी 7.5 लाख इतकी रक्कम मिळत होती. बिग बॉस 10 मधील स्पर्धक राहुल देवला घरात राहाण्यासाठी 2 करोड रुपये मिळाले होते तर पॅमेला अँडरसन या प्रसिद्ध हॉलिवूडमधील अभिनेत्रीला केवळ तीन दिवसांसाठी 2.5 करोड इतके बक्कळ मानधन देण्यात आले होते.