Raju Srivastava: प्रकृती सुधारत असताना अचानक काय झालं? राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू कसा झाला, समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:43 PM2022-09-21T13:43:21+5:302022-09-21T13:44:13+5:30
Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला. त्याचं कारण म्हणजे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत होते
नवी दिल्ली - प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. सुमारे ४२ दिवस दिल्लीतील एम्स रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. १० ऑगस्ट रोजी कार्डिएक अरेस्टनंतर राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमामध्ये होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मधल्या काळात त्यांच्या शरीराची हालचाल झाली होती. मात्र ते शुद्धीवर आले नव्हते. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्यामुळे ते या आजारपणातून उठून बसतील, सर्वांना पुन्हा हसवतील, असे वाटत होते. पण तसे होऊ शकले नाही. अखेर आज डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसल्याचे सांगितले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला. त्याचं कारण म्हणजे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत होते. पण डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले होते. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन झाल्याचीही माहिती मिळत होती. दरम्यान १५ दिवसांनंतर त्यांनी त्यांचा एक पाय हलवल्याची माहिती मिळाली होती. पण त्यांना शुद्ध आली नाही. त्यांच्या मेंदूचं सिटी स्कॅन केलं असता त्यामध्ये त्यांच्या मेंदूच्या एका मोठ्या भागाला सूज आल्याचे दिसून आले. एम्समध्ये एंजिओप्लास्टी केली असता त्यामध्ये त्यांच्या हार्टच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज दिसून आले होते.
एम्स रुग्णालयात राजू श्रीवास्तव यांच्यावर मोठ्या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू होते. मात्र या उपचारांना यश आले नाही. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थितपणे पोहोचत नव्हता, हेच त्यांच्या मृत्यूचे मोठे कारण ठरले. सातत्याने मेनुअल ऑक्सिजन सप्लाय केल्यामुळे मेंदूतील पेशी स्वत: काम सुरू करतील, अशी अपेक्षा डॉक्टरांना होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.