शूटिंग दरम्यान अचानक आली वडिलांची आठवण, असा दिला लेकीला धीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:28 AM2020-04-10T10:28:41+5:302020-04-10T10:30:23+5:30
त्यांनी फोनवरून मला धीर दिला आणि माझं मन शांत केलं.
‘कुरबान हुआ’ मालिकेतील नील (करण जोटवाणी) आणि चाहत (प्रतिभा रांता) यांच्या नाट्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक कथेने ‘झी टीव्ही’च्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. पण या मालिकेच्या कथानकाला लवकरच आणखी ब-याच कलाटण्या मिळणार असल्याने प्रेक्षकांमधील उत्सुकता अधिकच वाढणार आहे. आता व्यासजींनी (आयम मेहता) नील आणि चाहत यांच्या विवाहाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, नील आणि चहत हे अजूनही एकमेकांशी भांडत असतात. त्यात अचानक नील चाहतची एका धोकादायक प्रसंगातून सुटका करतो, पण नंतर तिचा पुन्हा छळ करतो.
मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना दिसेल की नील तब्बल 15 वर्षांनी व्यासजींच्या पायाशी झुकला आहे. पण चाहतच्या हातून नकळतपणे डॉ. बेग यांचा फोटो व्यासजींच्या पायाशी पडलेला असतो. तो जर त्यांनी पाहिला असता, तर चाहतचे गुपित उघड झाले असते. पण नील वेळीच तो फोटो उचलतो. ते पाहून चाहत सुटकेचा नि:श्वास टाकते खरी; पण नील तिला छळण्याची नवी योजना आखत असतो. बाजारपेठेत लोकांकडून चाहतची निर्भत्सना आणि चाहतचे वडील डॉ. बेग यांच्या फोटोवर काळी शाई फेकली जात असताना नील केवळ बघ्याची भूमिका घेतो. पण हा प्रसंग इतका भावनाप्रधान बनला की प्रतिभाला आपल्या वडिलांची तीव्रतेने आठवण आली. त्यामुळे त्या प्रसंगाचे चित्रीकरण संपताक्षणी प्रतिभाने सेटवरूनच आपल्या वडिलांना फोन लावला.
यासंदर्भात प्रतिभा म्हणाली, “बाजारपेठेतील प्रसंगाने मला खूप अस्वस्थ केलं. मला चाहतच्या मनात कोणत्या भावना उठत असतील, त्याची चांगली कल्पना आली. मी मला तिच्या जागी ठेवून विचार केला की कोणी जर माझ्या वडिलांच्या प्रतिमेची नुकसान केलं किंवा त्यांची हेटाळणी केली, तर चाहतला कसं वाटेल. त्या विचारांनी मला एकदम भावूक केलं आणि मी वडिलांना फोन लावला. मला त्यांच्याशी बोलायचं होतं. सध्या मी त्यांच्यासोबत राहात नाहीये, मी शिमल्यात असते. त्यावेळी मला माझ्या वडिलांची खूप आठवण आली.
मला प्रथमच असं जाणवलं की ते माझ्यापासून फार दूर गेले आहेत. पण त्यांनी फोनवरून मला धीर दिला आणि माझं मन शांत केलं. मी भावनाप्रधान झाल्याबद्दल त्यांनी माझी थोडी थट्टाही केली. आता त्यांना माझा हा प्रसंग कधी पाहता येईल आणि त्यांना माझा अभिनय कसा वाटला, हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता लागली आहे.”