अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल, मात्र यांतही आहे एक ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:49 AM2021-12-27T11:49:08+5:302021-12-27T11:51:57+5:30
‘अगर तुम ना होते’ (Agar Tum Na Hote) तील विवाह प्रसंगासाठी सिमरन कौरने स्वत:च साकारले आपले वधूचे रूप,चंदेरी नक्षी आणि भरतकाम असलेल्या गडद लाल रंगाच्या लेहेंग्यात अभिनेत्री सिमरन कौर (Simran Kaur)फारच सुरेख दिसत होती.
छोट्या पडद्यावरील ‘अगर तुम ना होते’ ही एक नवी रोमॅण्टिक मालिकेला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.मालिकेचा कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे अल्पावधीतच मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. मालिकेत नर्सच्या भूमिकेतील नियतीला नववधूच्या रूपात पाहून प्रेक्षक थक्क होतील.
मालिकेच्या आगामी भागांमध्ये नियतीला प्रेक्षक नववधूच्या रूपात पाहतील कारण ती डॉ. आनंद (तुषार चावला) यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळी अभिमन्यूची आपले लग्न नियतीशी झालेले असते, याची आठवण जागी होईल. त्याला नियतीचे लग्न थांबविण्याची तीव्र इच्छा होते, पण तो एका सज्जन व्यक्तीप्रमाणे नियतीला लग्नस्थळी घेऊन येतो. त्यानंतर तो तेथून निघून जातो.
लग्न लागण्याची वेळ जवळ येते, तेव्हा नियतीला मनातून तीव्रपणे जाणवते की ती मनापासून अभिमन्यूवरच खरे प्रेम करीत असते. त्यामुळे ती मंडप सोडून पळून जाते आणि डॉ. गुप्ता यांच्या दवाखान्यात तिला अभिमन्यू बेशुध्द पडलेला दिसतो. ती त्याला घेऊन लग्नमंडपात येते. पण पुढे काय होते, ते पाहणे फारच रंजक असणार आहे.
या विवाहप्रसंगातील उत्कंठा प्रेक्षकांना स्वस्थ बसू देणार नाही. पण या विवाहप्रसंगासाठी तिला जे सुंदर कपडे परिधान करावे लागले, त्यामुळे सिमरन फारच खुशीत होती.चंदेरी नक्षी आणि भरतकाम असलेल्या गडद लाल रंगाच्या लेहेंग्यात अभिनेत्री सिमरन कौर फारच सुरेख दिसत होती. तिने या लेहेंग्याला साजेसे कुंदनचे दागिने घातले होते. ‘अगर तुम ना होते’मधील या विवाहाच्या प्रसंगाच्या चित्रीकरणात सिमरनला खूप मजा आली, तरी तिने नववधूच्या रंगभूषेत स्वत:च्या कौशल्याचा वापर केला.
यासंदर्भात सिमरन कौर म्हणाली, “या मालिकेत माझ्या लग्नाचा प्रसंग असेल, असं जेव्हा मला समजलं, तेव्हा मला खूपच आनंद झाला. प्रत्येक मुलीला सुंदर कपड्यांची आवड असतेच, आणि नववधूचा वेश करण्याची संधी तर खूपच हवीहवीशी असते. मला तर हा प्रसंग साकार करताना खूपच आनंद झाला होता कारण त्यांनी माझ्यासाठी जो लेहेंगा निवडला होता, तो अप्रतिम होता. मला माझ्या खऱ्या लग्नात असाच लेहेंगा परिधान करायला आवडेल. त्यामुळे लग्नाच्या या प्रसंगाचं चित्रीकरण कधी एकदा होतंय असं मला झालं होतं.
मला या आकर्षक लेहंग्यावर साजेसे दागिने निवडण्यास सांगण्यात आले होते. माझी केशभूषा कशी असावी, यासाठी आमच्या टीमला मी माझ्याकडूनही काही सूचना केल्या होत्या. मला माझा नववधूचा अवतार खूप आवडला आणि माझे आई-वडिल तर मला त्या वेशात पाहून चकित झाले. मी त्यांची चेष्टा केली पण मला हे सांगावंसं वाटतं की माझ्या लग्नाचा प्रसंग जरी मालिकेत खूप गंभीर असला, तरी मला तो साकारताना खूपच मजा आली. इतका जड लेहेंगा परिधान करून फिरणं खूपच कठीण होतं. पण त्या सर्वांचं सार्थक झालं. हा प्रसंग पाहिल्यावर प्रेक्षक आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील, अशी मी अपेक्षा करते.”नियतीचे सुंदर रूप प्रेक्षकांना मोहित करणार असले, तरी ‘अगर तुम ना होते’तील या प्रसंगातील ट्विस्ट पाहून त्यांची उत्सुकता नक्कीच वाढेल.