विशीत आईची भूमिका साकारणा-या जिज्ञासाचे कोण आहे प्रेरणास्थान?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 11:10 AM2017-03-23T11:10:40+5:302017-03-23T16:40:40+5:30
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या थपकी प्यार की या मालिकेनं ट्विस्ट घेतला आहे. या मालिकेत आता सात वर्षांचा जनरेशन लीप ...
छ ट्या पडद्यावर गाजत असलेल्या थपकी प्यार की या मालिकेनं ट्विस्ट घेतला आहे. या मालिकेत आता सात वर्षांचा जनरेशन लीप पाहायला मिळत आहे. या मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा असलेल्या थपकी म्हणजेच जिज्ञासा सिंग हिच्या अवतीभोवती या मालिकेचं कथानक फिरत आहे. आता लीपनंतर मालिकेच्या कथानकाच्या कक्षा आणखी विस्तारल्या आहेत. आता थपकीची मुलं आणि तिचं बिहान(मनीष गोपलानी) शिवाय सुरु असलेलं आयुष्य या भोवती आता मालिकेचं कथानक फिरणार आहे. या मालिकेत लीपनंतर अवघ्या विशीत असलेली जिज्ञासा सिंग दोन मुलींच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या वयात आईची भूमिका साकारत असताना अवघडल्यासारखं किंवा शरमेसारखं काहीच वाटत नसल्याचे जिज्ञासाने स्पष्ट केलं आहे. याउलट इतक्या लवकर अशी मोठी आईची भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याबद्दल ती आनंदी आहे. या वयात विविध शेड असलेल्या भूमिका साकारत मिळत असल्याचा आनंद वाटत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे आपल्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे जिज्ञासाने सांगितले. ज्यावेळी आईची भूमिका साकारायचे कळले त्यावेळी जिज्ञासाच्या डोळ्यासमोर एकच चेहरा आला. हा चेहरा म्हणजे जिज्ञासाच्या आईचा. ही भूमिका साकारण्यासाठी माझ्या आईपेक्षा दुसरे कोणतंही प्रेरणास्थान माझ्यासाठी असूच शकत नाही असे ती अभिमानाने सांगते. प्रत्यक्षात आई बनणे आणि आईपण निभावणे हे खूप आव्हानात्मक असते हे मी माझ्या आईकडे पाहून पाहून कळल्याचे जिज्ञासाने सांगितले. त्यामुळे या मालिकेत आई बनण्याची संधी मिळाली तेव्हा आपलं बालपण आठवल्याचे जिज्ञासा सांगते. आईने आपलं संगोपन कसे केले, कसं वाढवलं, कशी काळजी घेतली या सगळ्या गोष्टी मी आठवल्या असे जिज्ञासाने म्हटलं आहे. या भूमिकेच्या निमित्ताने आता तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्ती करण्याची संधी मिळाल्याचे जिज्ञासाने सांगितले आहे. सात वर्षांच्या लीपनंतर मालिकेत थपकी आणि बिहान एकमेंकांपासून वेगळे होतात. त्याचे मार्ग वेगळे होतात. दोघंही वेगवेगळं राहायला लागतात. थपकी क्राईम रिपोर्टर म्हणून आपलं करियर सुरु ठेवते. तर बिहान संकरच्या दबावाखाली असतो. थपकी आणि बिहानच्या आयुष्यात जुळ्या मुली आल्या आहेत. बानी आणि टीना अशी त्यांची नावं आहे. बानी थपकीसोबत तर टीना बिहानसोबत राहते. बिहानच्या म्हणजेच आपल्या वडिलांच्या स्मृतीभ्रंशामागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न त्याच्या जुळ्या लेकी म्हणजेच बानी आणि टीना करतात. त्यांच्या प्रयत्नांना यश येणार का, बिहानची स्मृती परत येणार का, थपकी आणि बिहान पुन्हा एकत्र येणार का या सगळ्यांची उत्तर या मालिकेत रसिकांना लवकरच मिळणार आहेत.