म्हणून तडकाफडकी 'डॉक्टर डॉन' मालिकेचा सेट दुस-या ठिकाणी हलवला, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:34 PM2020-07-13T14:34:11+5:302020-07-13T14:34:55+5:30

'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. संपूर्ण देश कोविड-१९च्या महामारीशी लढत असताना, मालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाही.

Why Doctor Don TV Serial Set Shifted To Other Location | म्हणून तडकाफडकी 'डॉक्टर डॉन' मालिकेचा सेट दुस-या ठिकाणी हलवला, हे आहे कारण

म्हणून तडकाफडकी 'डॉक्टर डॉन' मालिकेचा सेट दुस-या ठिकाणी हलवला, हे आहे कारण

googlenewsNext

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने निराळा धुमाकूळ घालत, आपले सगळ्यांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या. डार्लिंग डीनवर मनापासून प्रेम करणारा डॉक्टर डॉन, हास्याचे अनेक डोज आपल्यासाठी घेऊन येऊ लागला. ही मालिका पाहताना हसूनहसून पुरेवाट होते. भन्नाट संकल्पना असलेली डॉक्टर डॉन ही मालिका, नेहमीच भरपूर आनंद देणारी ठरली आहे. 

लॉकडाऊनमुळे सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबले आणि डॉक्टर डॉन सुद्धा पडद्यावरून नाहीसा झाला. नियमांमध्ये थोडी शिथिलता आणल्यामुळे, पुन्हा एकदा चित्रिकरण सुरु झाले आहे. १३ जुलै पासून या मालिकेचे नवीन भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. असे असताना, 'झी युवा'वरील 'डॉक्टर डॉन' एका आगळ्यावेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. पडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात कोविड योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.

'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेटमध्ये, हॉस्पिटलच्या सेटचा समावेश आहे. मालिकेत पाहायला मिळत असलेलं हे हॉस्पिटल, यापुढे कोविड सेंटर म्हणून वापरले जाणार आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर, कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यावरील उपाय म्हणून अनेक कोविड सेंटर्सची निर्मिती केली जात आहे. 

मीरा-भाईंदर परिसरात 'डॉक्टर डॉन' या मालिकेतील हॉस्पिटलचे चित्रीकरण करण्यात येतेय. या महापालिकेला, कोविड सेंटरसाठी जागेची आवश्यकता होती. हॉस्पिटलचा सेट उभारलेला असल्याने, 'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. संपूर्ण देश कोविड-१९च्या महामारीशी लढत असताना, मालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाही. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी मालिकेचा सेट, महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. मालिकेत गोंधळ, धमाल आणि मजामस्तीचा केंद्रबिंदू ठरणारा हा सेट, यापुढे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

चित्रीकरणासाठी नवा पर्याय शोधणे, ही छोटीशी समस्या समोर उभी थकलेली असली, तरीही मालिकेच्या सेटचा वापर एका अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी होणार असल्याने, टीममधील प्रत्येकच कलाकार खूप खुश आहे. नेहमी त्याच्या धुंदीत असणारा, राडे करणारा डॉक्टर डॉन, आता थेट कोविड योद्धयांच्या मदतीला धावून आलेला आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण कर्जत येथे एका रिसॉर्ट मध्ये होतंय.

Web Title: Why Doctor Don TV Serial Set Shifted To Other Location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.