'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना अद्याप का आहेत सिंगल? अभिनेता म्हणाले - "मी भीष्म प्रतिज्ञा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:10 IST2024-12-19T11:09:52+5:302024-12-19T11:10:13+5:30
Mukesh Khanna : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान लग्न न करण्याचे कारण सांगितले. यासोबतच त्यांनी लग्नाबाबतही आपले मतही मांडले.

'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना अद्याप का आहेत सिंगल? अभिनेता म्हणाले - "मी भीष्म प्रतिज्ञा..."
ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी 'शक्तीमान' आणि 'महाभारत'मधील 'भीष्म पितामह' या त्यांच्या प्रतिष्ठित पात्रांनी खूप लोकप्रियता मिळवली. ज्येष्ठ अभिनेते त्यांच्या स्पष्ट मतांसाठीही ओळखले जातात. या सगळ्याच्या दरम्यान मुकेश खन्ना यांनी नुकतेच लग्नावर भाष्य केले आणि त्यांनी लग्न का केले नाही याचा खुलासाही केला.
मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मुकेश खन्ना यांनी लग्न, जीवन आणि आत्म्याचे नाते या संकल्पनेवर आपले मत मांडले होते. अभिनेते म्हणाले की,"लग्न ही एक संस्था आहे, एक पवित्र बंधन आहे." ते म्हणाले, "माझा नेहमी विश्वास आहे की लग्नात दोन आत्मे एक होतात. पण आजकाल आपण लग्नाला दोन बाहुल्यांचा खेळ समजतो. भगवंताच्या या स्वप्नात आपण सर्व जीव एक भूमिका बजावत असतो. हे देवाचे स्वप्न आहे, एक भ्रम आहे." खन्ना पुढे म्हणाले, "जेव्हा तुम्ही या जगात आलात तेव्हा तुम्ही आत्मा आहात. अंबानींसारख्या विशिष्ट कुटुंबात जन्म घेतल्याचा अर्थ असा नाही की तुमचे तुमच्या भावंडांसोबत कर्माच्या पलीकडे कोणतेही खोल नाते आहे. भावाला त्या कुटुंबात स्थान मिळू शकते केवळ त्याच्या कर्मामुळे."
मुकेश खन्ना यांनी लग्न का केले नाही?
यादरम्यान मुकेश खन्ना यांनीही त्यांनी लग्न का केले नाही याचा खुलासा केला. अविवाहित राहण्याचा निर्णय कोणत्याही नवसाने किंवा कोणत्याही विशेष कारणामुळे घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ''आताही मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे, मला ते आवडत नाही म्हणून नाही, तर कदाचित माझ्या नशिबात ते लिहिलेले नाही म्हणून मी भीष्म प्रतिज्ञा घेतली आहे. कदाचित मी माझ्या शालेय कार्यक्रमात प्रतिज्ञा इतक्या जोरदारपणे सांगितल्या आहेत की नियतीने या प्रकरणात माझे नशीब ठरवले आहे."