जुई गडकरी का म्हणतेय रडायचं नाही तर लढायचं!, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:10 PM2022-11-26T12:10:47+5:302022-11-26T12:11:14+5:30

Jui Gadkari : पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Why Jui Gadkari says not to cry but to fight!, Know about this | जुई गडकरी का म्हणतेय रडायचं नाही तर लढायचं!, जाणून घ्या याबद्दल

जुई गडकरी का म्हणतेय रडायचं नाही तर लढायचं!, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील.

या मालिकेबद्दल जुई गडकरी म्हणाली की, ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. पुढचं पाऊल मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे या नव्या पात्रावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतील याची खात्री आहे.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी लिहिलेली असते आणि ती कसाही मार्ग काढून आपल्यापाशी येते. या मालिकेच्या बाबतीतही काहीसं असंच म्हणता येईल. मनीध्यानी नसताना या मालिकेसाठी विचारणा झाली. मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं. 


जुई पुढे म्हणाली की, मुंबईमध्ये जवळपास ७ ते ८ लोकेशन्सवर आम्ही शूट करत आहोत. आमची संपूर्ण टीम गेले चार महिने या मालिकेवर काम करते आहे. मला खात्री आहे कल्याणी इतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम प्रेक्षक सायली या नव्या व्यक्तिरेखेला देतील. आयुष्यातील एका प्रसंगाबद्दल जुई गडकरीने सांगितले की, आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपण ठरवतो आता रडायचं नाही तर लढायचं. माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग मला आठवतो आणि तो म्हणजे मी अकरावीत नापास झाले होते. मुळात मला कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधून शिकायचं नव्हतं. मला बीएमएम म्हणजेच बॅचलर ऑफ मास मीडिया मध्येच करिअर करायचं होतं. मात्र ते करण्यासाठी कोणत्याही एका शाखेमधून अकरावी आणि बारावी करणं महत्त्वाचं होतं. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र अकरावीत नापास झाले. मात्र नापास झाल्यामुळे रडत न बसता मी त्यातून सावरले आणि जोमाने अभ्यासाला लागले. मनापासून अभ्यास केला आणि टीवायला असताना मी युनिव्हर्सिटीतून पहिली आले. हा प्रसंग मी कधीच विसरु शकत नाही.

Web Title: Why Jui Gadkari says not to cry but to fight!, Know about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.