का रे दुरावा फेम सुयश टिळक का होता द्विधा मनस्थितीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 05:54 PM2016-12-19T17:54:42+5:302017-01-02T14:20:21+5:30
प्राजक्ता चिटणीस का रे दुरावा या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुयश टिळक लवकरच सख्या रे या मालिकेत झळकणार आहे. ...
का रे दुरावा या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुयश टिळक लवकरच सख्या रे या मालिकेत झळकणार आहे. त्याची या मालिकेतील भूमिका का रे दुरावा या मालिकेतील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे असे तो सांगतो. या त्याच्या नव्या मालिकेबाबत सुयशने सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...
का रे दुरावा या मालिकेनंतर छोट्या पडद्यावर परतायला येवढा वेळ का लागला? दरम्यानच्या काळात मालिका करायच्याच नाही असे तू ठरवले होतेस का?
का रे दुरावा या मालिकेनंतर मला छोट्या पडद्यावरच्या अनेक ऑफर्स येत होत्या. पण कोणतीही भूमिका मला तितकीशी आवडत नव्हती. त्यामुळे मी छोट्या पडद्यापासून दूर राहाणेच पसंत केले होते. त्या दरम्यान मी स्ट्रॉबेरी हे नाटक केले. माझ्या या नाटकाला सगळ्याच वयोगटातील लोकांनी पसंती दर्शवली. छोट्या पडद्यावर त्याच त्याच भूमिका करायच्या नाहीत असे मी आधीपासूनच ठरवले होते. त्यामुळे माझ्या का रे दुरावा, दुर्वा, पुढचे पाऊल या प्रत्येक मालिकांमधील भूमिका एकमेकांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. त्यामुळे योग्य पटकथा आणि वेगळी भूमिका मिळाल्यावर पुन्हा मालिकांकडे वळायचे असे मी आधीच ठरवले होते.
सख्या रे या मालिकेबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
सख्या रे या मालिकेबाबत विचारण्यासाठी चिन्मय मांडलेकरचा मला फोन आला होता. चिन्मय मांडलेकर एखादी गोष्ट करत आहे, म्हणजे ती चांगली असणारच याचा मला संपूर्ण विश्वास होता. केवळ या दरम्यान मी एका चित्रपटासाठी वजन वाढवल्यामुळे मी थोडासा द्विधा अवस्थेत होतो. पण या मालिकेची निर्मिती चिन्मय करत असल्याने मी काहीच मिनिटांत या मालिकेसाठी होकार दिला.
तू चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत आहेस. कोणते माध्यम तू जास्त एन्जॉय करतोस?
कोणत्याही माध्यमांमध्ये कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते. मालिकेत एक कथा अधिक काळ लोकांना पाहायला मिळते तर चित्रपटात ती कथा तीन तासात प्रेक्षकांसमोर मांडली जाते. मी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांनी मला खरी ओळख मिळवून दिली. मी छोट्या पडद्यावर काम करायचे म्हणून करत नाही तर मी छोट्या पडद्यावर काम करणे खूप एन्जॉय करतो.
सख्या रे या मालिकेच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा आहे?
मी आतापर्यंत अनेक मालिका केल्या आहेत. पण या मालिकेच्या चित्रीकरणाचा वेगळाच अनुभव आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मला एक सुखद धक्का मिळाला. मालिकेच्या सेटवर सकाळी पोहोचल्यानंतर दिवसभरात तुम्हाला कोणकोणत्या दृश्यांचे चित्रीकरण करायचे आहे त्या दृश्यांची पटकथा प्रोडक्शन टीममधील मंडळी तुमच्या हातात देतात. यामुळे एक कलाकार म्हणून तुम्हाला दिवसभर किती आणि काय काम करायचे आहे याची कल्पना येते. चिन्मय एक निर्माता होण्याआधी एक अभिनेता असल्यामुळे एका कलाकारासाठी चांगले काय आहे याचा तो सगळ्यात पहिल्यांदा विचार करतोय. या मालिकेच्या चित्रीकरणाला तर खूप मजा येतेय. कारण ही एक रहस्यमय मालिका असल्याने मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच लागलेली आहे.