वाइल्ड कार्डने प्रवेश मिळवणार्या पुण्याच्या प्रेरणाने प्रभावित केले सुपर डान्सर 3 च्या परीक्षकांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 20:30 IST2019-04-18T20:30:00+5:302019-04-18T20:30:03+5:30
वाइल्ड कार्ड एंट्रीसाठी निवडण्यात आलेल्या मुलांपैकी पुण्याच्या 12 वर्षीय प्रेरणा साळवीने आपल्या परफॉर्मन्सने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

वाइल्ड कार्डने प्रवेश मिळवणार्या पुण्याच्या प्रेरणाने प्रभावित केले सुपर डान्सर 3 च्या परीक्षकांना
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय, दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या रविवारी वाइल्ड कार्ड एंट्रीमधून स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे.
वाइल्ड कार्ड एंट्रीसाठी निवडण्यात आलेल्या मुलांपैकी पुण्याच्या 12 वर्षीय प्रेरणा साळवीने आपल्या परफॉर्मन्सने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रेरणा सुपर डान्सर महाराष्ट्राची विजेती आहे. सुपर डान्सर महाराष्ट्र हा खिताब जिंकणार्या प्रेरणाने त्या प्रवासात अनेक अडथळे पार केले आहेत. गीता कपूर एकदा म्हणाली होती की, जे कोणी सुपर डान्सर महाराष्ट्र स्पर्धा जिंकेल, त्याला सुपर डान्सर 3 मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश मिळेल. त्यामुळे तिने सुपर डान्सर महाराष्ट्र हा खिताब जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न केले. सुपर डान्सर 3 मध्ये प्रेरणाची निवड झाली नव्हती. पण सुपर डान्सर महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकल्यामुळे तिला या कार्यक्रमात थेट प्रवेश मिळाला.
प्रेरणाचा परफॉर्मन्स पाहून शिल्पा शेट्टी म्हणाली, “तू होतीस कुठे इतके दिवस? हा तुझा परफॉर्मन्स अद्भुत होता.” यावर गीता कपूरने देखील शिल्पाच्या मताला दुजोरा दिला. ती म्हणाली, “सुपर डान्सर महाराष्ट्राच्या विजेत्याला सुपर डान्सर 3 मध्ये सामील करून घेण्याचा निर्णय मी घेतल्याचा मला आज अभिमान होत आहे. प्रेरणा तुझा परफॉर्मन्स अप्रतिम होता.” तर प्रेरणाचा परफॉर्मन्स पाहून अनुराग बासू म्हणाला, “सिंक्रोनायझेशन पासून ते फिनिशिंगपर्यंत सारे काही अगदी अचूक होते. मला तुझा परफॉर्मन्स खूप खूप आवडला.”
वाइल्ड कार्ड एंट्री मधील सगळेच स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत असल्याने प्रेरणाला सुपर डान्सर 3 मध्ये प्रवेश मिळणार का? हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सुपर डान्सर 3 चा हा भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.